Ankita Walawalkar : सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल म्हणून लोकप्रिय ठरलेली आणि ‘बिग बॉस मराठी’मुळे घराघरात ओळख निर्माण केलेली अंकिता वालावलकर हिने दसऱ्याच्या मंगलदिनी आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. सणासुदीच्या या वातावरणात तिने आणि तिचा पती कुणाल भगत यांनी एक नवा प्रवास सुरू करत असल्याची गोड बातमी शेअर केली आहे.
अंकिता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असून ती आपल्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी जोडून ठेवते. यंदाच्या दसऱ्याच्या दिवशी तिने खास व्हिडीओ पोस्ट करत नवं प्रोडक्शन हाऊस सुरू केल्याची घोषणा केली. ‘Mud Eye Studios’ या नावाने या निर्मिती कंपनीचा शुभारंभ झाला असून, हे दोघे मिळून क्रिएटिव्ह जगतात नवी इनिंग सुरू करत आहेत.
अंकिताने या पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, “प्रत्येक मोठ्या स्वप्नाला एक योग्य शुभारंभाचा क्षण मिळतो आणि तो क्षण आम्हाला दसऱ्याच्या या दिवशी लाभला आहे. मी आणि कुणाल आमचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू करत आहोत. दोन क्रिएटिव्ह विचार एकत्र आले की भन्नाट काहीतरी निर्माण होतं, याची आम्हाला खात्री आहे.” तिच्या या संदेशावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
‘Mud Eye Studios’ या नावामागील अर्थही अंकिताने स्पष्ट केला आहे. ती म्हणते, “Mud म्हणजे माती – जी आपल्या मुळांचा, आधाराचा आणि नैसर्गिकतेचा प्रतीक आहे. Eye म्हणजे डोळा – जो दृष्टी, दृष्टिकोन आणि कलात्मक निरीक्षणाचं प्रतीक आहे. या दोन शब्दांच्या एकत्रिततेतून आमच्या निर्मिती कंपनीचं नाव साकारलं.”
अंकिता वालावलकर Ankita Walawalkar आणि कुणाल भगत या दोघांचं फेब्रुवारी महिन्यात लग्न झालं होतं. कुणाल हा पेशाने गायक आणि संगीतकार असून त्याचा कलाक्षेत्राशी आधीपासूनच घट्ट संबंध आहे. आता दोघांनी मिळून या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून मनोरंजनविश्वात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. Ankita Walawalkar
“सूरज चव्हाण लग्नाच्या चर्चेत, धनंजय पोवारने होणाऱ्या वहिनीचं नाव सांगितलं?”
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर घेतलेला हा नवा निर्णय चाहत्यांसाठी एक सुखद धक्का ठरला आहे. अंकिता वालावलकर हिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला भरभरून शुभेच्छा दिल्या असून या नव्या प्रवासात ती आणि कुणाल उत्तम यश मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ‘Mud Eye Studios’च्या माध्यमातून नेमकं काय भन्नाट साकारलं जाणार, याची आतुरता आता प्रेक्षकांमध्ये वाढू लागली आहे.









