नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर हे भगवान शिवशंकराच्या बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. या पवित्र स्थळाला वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते, मात्र श्रावण महिन्यात येथे भक्तीचा माहोल अधिकच अनुभवायला मिळतो. साध्या भाविकांप्रमाणेच अनेक मराठी व बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होत असतात.
काही दिवसांपूर्वीच अभिनेता प्रसाद ओक व त्यांची पत्नी मंजिरी ओक यांनी आपल्या ज्योतिर्लिंग यात्रेला याच मंदिरातून सुरुवात केली होती. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरनेदेखील आपल्या कुटुंबासह त्र्यंबकेश्वरला भेट दिली.
अमृताने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर याचा व्हिडीओ शेअर करत, “हर हर महादेव!” असं कॅप्शन दिलं आहे. त्या व्हिडीओमध्ये ती आपल्या आईसह व भाचा निर्वाण आणि भाची नुरवी यांच्यासोबत मंदिरात दर्शन घेताना दिसते. विशेष म्हणजे ही तिघांची मावशीसोबतची पहिलीच ट्रिप असल्याचे अमृताने सांगितले. तिने बहिणीच्या मुलांबरोबरचे गोड फोटो शेअर करत “पहिल्यांदाच निर्वाण आणि नुरवी मावशीबरोबर आलेत” असे कॅप्शनही दिले.
यावेळी अभिनेत्रीने आकर्षक प्रिटेंड साडी नेसून पारंपरिक लूक निवडला होता. तिनेच सांगितल्याप्रमाणे ही साडी अभिनेत्री मंजिरी ओकने भेट दिली होती. मंदिराच्या परिसरात अमृता आपल्या भाच्यांना विविध गोष्टी दाखवत असल्याचा देखील व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
सोशल मीडियावर अमृताच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया आल्या आहेत. “हर हर महादेव!”, “किती सुंदर क्षण टिपलाय”, “अमृताचा हा कुटुंबासोबतचा बॉण्ड खूप गोड आहे” अशा सकारात्मक प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या.
अमृताचा तिच्या भाच्यांबरोबरचा जवळचा संबंध आधीपासूनच चर्चेत असतो. आईसारखी काळजी घेणारी मावशी म्हणून ती कायम कौतुकास पात्र ठरते. या यात्रेतून अमृताने पुन्हा एकदा तिचं कुटुंबाशी असलेलं घट्ट नातं दाखवून दिलं आहे.









