झी मराठीवरील आगामी मालिका ‘तारिणी’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ११ ऑगस्टपासून प्रेक्षकांसमोर येणाऱ्या या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अंधाराविरोधात लढणारी आणि समाजाचं रक्षण करणारी एक धाडसी स्त्री, तिच्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांची कहाणी ही मालिका सांगणार आहे.
शिवानी सोनार ही या मालिकेची मुख्य अभिनेत्री असून, तिच्यासोबत स्वराज नागरगोजे नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. याआधी ‘तुझी माझी जमली जोडी’ आणि ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’मध्ये दमदार कामगिरी करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेला स्वराज, आता ‘तारिणी’ मालिकेत एका अंडरकव्हर कॉपची भूमिका साकारतोय.
स्वराजने या भूमिकेचा अनुभव सांगताना एक भन्नाट किस्सा शेअर केला. प्रोमो शूटच्या वेळी बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर त्याला आणि शिवानीला तब्बल १५ सेकंद काहीच समजलं नाही. “आवाज इतका प्रचंड होता की दोघंही काही क्षण सुन्न झालो. कानठळ्या बसल्या आणि मग अचानक हसू फुटलं,” असं त्याने सांगितलं. हा अनुभव तो आयुष्यभर विसरणार नसल्याचंही तो म्हणाला.
‘तारिणी’साठी ऑडिशन प्रक्रियेतही त्याला काही अडचणी आल्या होत्या. दोन वेळा ऑडिशन मिस झाली, पण त्याने घरून व्हिडिओ ऑडिशन पाठवून संधी साधली. अंडरकव्हर एजंटचा प्रभावी लूक साधण्यासाठी त्याने स्वतःच्या फिटनेसवर भर दिला. त्याला झी मराठीकडून भूमिका निश्चित झाल्याचा फोन आल्यानंतरचा क्षण त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरला.
या मालिकेत स्वराज ‘केदार’ ही भूमिका साकारतोय – एक एकटा राहणारा, आपल्या हरवलेल्या वडिलांचा शोध घेणारा युवक. त्याच्या आयुष्यातील संघर्ष, अॅक्शन आणि मिशन यामध्ये गुंफलेली ‘तारिणी’ची कथा प्रेक्षकांना वेगळीच अनुभूती देणार आहे.
‘तारिणी Serial’ चा प्रोमो प्रदर्शित झाल्यावर केवळ २४ तासांत १ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचं स्वराजने आनंदाने सांगितलं. प्रेक्षकांचा अशाच प्रकारचा प्रतिसाद ही मालिका मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.









