‘वेड’ चित्रपटाने मराठी सिनेमात नवा इतिहास घडवला आणि आता त्याचा दुसरा भाग म्हणजेच Ved 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची अधिकृत माहिती अभिनेत्री जिनिलिया देशमुखने दिली आहे.
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेला रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या या पहिल्यावहिल्या मराठी सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने तो मराठी सिनेसृष्टीतला एक यशस्वी टप्पा ठरला. याच चित्रपटातून जिनिलिया देशमुखने मराठीत पदार्पण केलं, तर रितेशने पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.
‘वेड’मधील गाणी, संवाद आणि विशेषतः रितेश-जिनिलियामधील केमिस्ट्रीने या चित्रपटाला एक खास उंची मिळवून दिली. ‘वेड’ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत जवळपास ७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. हे यश पाहता, या चित्रपटाचा दुसरा भाग येणार का, असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत होता.
आता याबाबत प्रत्यक्ष अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिनेच एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत जिनिलिया म्हणाली, “ Ved 2 ‘ आधीच ठरलेलं आहे. सध्या मी आणि रितेश दोघंही आमच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहोत. पण वेळ मिळताच आम्ही नक्कीच एकत्र काम करणार आहोत. प्रेक्षकांनी इतक्या प्रेमाने ‘वेड’ स्वीकारला, त्याच प्रेमामुळेच दुसऱ्या भागाची तयारी सुरू केली आहे. कदाचित यासाठी एक-दोन वर्षांचा वेळ लागू शकतो, पण हा चित्रपट नक्की होणार आहे.”

तिच्या या वक्तव्यामुळे ‘ Ved 2 ’ची अधिकृत घोषणा झाली असून प्रेक्षकांमध्ये नव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.
तसेच, जिनिलियाने आपल्या मुलांचा ‘वेड’ चित्रपटावरील प्रेमाचाही उल्लेख केला. ती म्हणाली, “’वेड’ आमच्यासाठी जितका खास आहे, तितकाच आमच्या मुलांसाठीही आहे. रिआन आणि राहीलने ‘वेड’ आणि ‘धमाल’ खूप एन्जॉय केला, पण अजून त्यांनी ‘जाने तू… या जाने ना’ पाहिलेला नाही. अलीकडे आम्ही त्यांना ‘तारे जमीन पर’ देखील दाखवला. तो चित्रपट खूप संवेदनशील असल्यामुळे मी तो मुद्दाम त्यांना दाखवला.”
Tejaswini Pandit चा खुलासा, म्हणाली – “राजकारणासाठी संधी मिळाली तर नक्की विचार करेन!”
‘वेड’ हा चित्रपट तेलगू चित्रपट **‘मजिली’**चा अधिकृत रिमेक होता. मात्र रितेश आणि जिनिलियाच्या अभिनयानं आणि दिग्दर्शनातून त्याला एक वेगळीच ओळख मिळाली. पोस्ट-पँडेमिक काळात मराठीत बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणाऱ्या मोजक्या चित्रपटांपैकी ‘वेड’ हे नाव आघाडीवर आहे.
चित्रपटाच्या यशानंतर रितेश देशमुख आता ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यग्र आहे. तो चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची तयारी जोमात सुरू आहे.
मात्र, ‘ Ved 2 ’साठी जिनिलियाकडून मिळालेली पुष्टी ही रितेश-जिनिलिया फॅन्ससाठी नक्कीच एक मोठी बातमी ठरते. ‘वेड’मध्ये दाखवलेली प्रेमकहाणी, नात्यांमधील गुंतागुंत आणि त्यामागचं सादरीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळणार असल्यामुळे ‘ Ved 2 ’कडून प्रेक्षकांची अपेक्षा निश्चितच वाढली आहे.
मराठी प्रेक्षकांसाठी आगामी काळात ‘वेड 2’ हा एक बहुप्रतिक्षित सिनेमा ठरणार आहे. रितेश-जिनिलियाची जोडी, पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर काय जादू निर्माण करते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.