ADVERTISEMENT

तुला शिकवीन चांगलाच धडा मधील वळणावर संतापले प्रेक्षक; म्हणाले, मालिकेचा अर्थच उरलेला नाही!

तुला शिकवीन चांगलाच धडा या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या धक्कादायक घडामोडी घडत आहेत. चारुहासने भुवनेश्वरीशी लग्नासाठी तयारी दाखवली असल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त करत मालिकेवर कठोर शब्दांत टीका केली आहे
तुला शिकवीन चांगलाच धडा

झी मराठीवरील गाजलेली मालिका ‘ तुला शिकवीन चांगलाच धडा ’ सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी तिच्यावर भरभरून प्रेम केलं होतं, मात्र अलीकडे मालिकेतील कथानकाने विचित्र वळण घेतल्याने त्याच प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही भागांमध्ये अक्षरा आणि अधिपती यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्यामुळे आणि भुवनेश्वरीच्या सततच्या हस्तक्षेपामुळे मालिकेतील नातेसंबंध अधिक गुंतागुंतीचे बनले आहेत. अक्षरा घर सोडून गेल्यानंतर तिचं आयुष्य आणि शिक्षण कसं बाजूला टाकलं जातंय, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण या दरम्यान, भुवनेश्वरीच्या कटकारस्थानांनी मालिकेला पूर्णपणे नकारात्मक छटा दिली आहे.

नुकत्याच प्रसारित झालेल्या प्रोमोमध्ये, चारुहास अक्षराला घरी परत आणण्यासाठी भुवनेश्वरीपुढे हात जोडताना दिसतो. भुवनेश्वरीकडे माफी मागताना आणि तिच्या इच्छांची चौकशी करताना चारुहासची लाचारी दाखवली जाते. भुवनेश्वरी त्याला उत्तर देते की तिचं एकमेव स्वप्न आहे की तो तिला लग्नाची मागणी घालावी. त्यावर चारुहास अट ठेवतो की “सुनबाईला परत घरी आणा, मग मी तुमचं स्वप्न पूर्ण करेन.”

प्रेक्षक भडकले पहा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया! तुला शिकवीन चांगला धडा

ही घडामोड पाहून अनेक प्रेक्षक संतप्त झाले आहेत. सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडतोय. अनेकांनी ही मालिका थांबवावी अशी मागणी केली आहे. काहींनी स्पष्टपणे लिहिलंय की, “ही मालिका शिक्षणाचा अपमान करतेय. नेहमी कटकारस्थानांना यश मिळालेलं दाखवतंय. भुवनेश्वरीसारख्या पात्राचं समर्थन केलं जातंय. चारुहाससारखा सुशिक्षित माणूस अशा स्त्रीसमोर हात जोडतोय याचं दुःख वाटतं.”

या मालिकेकडून अनेक प्रेक्षकांची अपेक्षा होती की, शेवटी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित होईल, अक्षराचं स्वबळ दाखवलं जाईल. परंतु त्याऐवजी, कथानक फक्त नकारात्मकतेने भरलेलं वाटू लागलंय. मालिकेतील अनेक वळणं अकल्पित आणि अवास्तव वाटत आहेत, असं अनेक प्रेक्षकांनी स्पष्ट केलं आहे.

यामुळेच प्रेक्षक मालिकेच्या टीमकडून एका ‘मेजर ट्विस्ट’ची अपेक्षा करत आहेत. ते म्हणतात की, जर लेखनात काहीतरी वेगळं आणि सशक्त घडवलं, भुवनेश्वरीची फसवणूक उघडकीस आली, शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलं, तर ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवू शकेल.

एका कमेंटमध्ये म्हटले आहे, “शेवटच्या क्षणी भुवनेश्वरीने स्वतः कबुली द्यावी आणि अक्षराच्या शिक्षणाचा, आत्मविश्वासाचा विजय दाखवावा. असं केल्यास ही मालिका खरंच ‘द बेस्ट’ होईल. अजून वेळ गेलेली नाही.”

Premachi Gosht : स्टार प्रवाहवरील मालिकेच्या वेळेत बदल! प्रेमाची गोष्ट बंद होणार?

मात्र सध्याच्या स्थितीत, अनेक प्रेक्षकांचा संयम सुटल्याचं दिसतं. “बंद करा ही फालतू मालिका”, “दिसतंय की लेखकांकडे दिशा नाहीये”, “कोणाला काही कळत नाहीये आता” अशा कमेंट्सचा जोर वाढत आहे.

पुढे भुवनेश्वरीचं खरं रूप समोर येईल का? अक्षराचा घरात पुन्हा सन्मानपूर्वक प्रवेश होईल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, मालिकेच्या टीमने प्रेक्षकांचा सूर ओळखून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका दररोज संध्याकाळी 6 वाजता झी मराठीवर प्रसारित होत असून, पुढचे भाग काय वळण घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.