disha pardeshi father emotional story raja shivaji movie : ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटामुळे सध्या मराठी चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा रंगली आहे. अभिनेता रितेश देशमुखच्या या महत्त्वाकांक्षी सिनेमात अनेक कलाकारांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या असून अभिनेत्री दिशा परदेशीच्याही अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. या चित्रपटात दिशाने अफझलखानाच्या पत्नीची भूमिका साकारत संजय दत्त यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. मात्र चित्रपटाच्या यशाच्या आनंदातच तिच्या आयुष्यात मोठं दुःख आलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिशाने तिच्या वडिलांविषयी बोलताना भावनिक आठवणी सांगितल्या.
दिशा परदेशीने सांगितलं की, तिच्या करिअरमधील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता आणि तिच्या यशामागे आई-वडिलांचा मोठा वाटा होता. विशेष म्हणजे ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा पाहण्याची तिच्या वडिलांची खूप इच्छा होती. ते मुलीच्या कामाबद्दल प्रचंड अभिमान बाळगत होते. इतकंच नाही तर ते ओळखीच्या लोकांना फोन करून आवर्जून हा चित्रपट पाहण्यास सांगत होते. आपल्या मुलीने इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केल्याचा त्यांना आनंद होता.
दिशाने मुलाखतीत सांगितलं की, एकदा तिची आई आणि काही मित्रमंडळी सिनेमा पाहण्यासाठी गेले होते. त्या वेळी आईने तिच्या वडिलांनाही सोबत येण्यास सांगितलं होतं. पण घरात असलेल्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लाची काळजी घेण्यासाठी त्यांनी घरीच थांबण्याचा निर्णय घेतला. “तुम्ही जा, मी नंतर बघेन,” असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर दिशा चित्रपटाच्या प्रमोशन आणि इतर कामांमध्ये व्यस्त झाली. मात्र तिने मनोमन ठरवलं होतं की पुढच्या आठवड्यात वेळ काढून ती स्वतः वडिलांना घेऊन सिनेमा पाहायला जाणार.
पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. सिनेमा पाहण्याआधीच तिच्या वडिलांचं अचानक निधन झालं. या घटनेचा उल्लेख करताना दिशा भावूक झाली. “माझ्यापेक्षा हे स्वप्न बाबांचंच जास्त होतं,” असं ती म्हणाली. त्यांच्या जाण्यामुळे आयुष्यात निर्माण झालेली पोकळी आणि त्यांनी मुलीवर ठेवलेला विश्वास याची आठवण करताना तिचा आवाजही भरून आला.
हे पण वाचा.. अनुष्का सरकटे-निखिल चव्हाणच्या साखरपुड्याची चर्चा; अभिनेत्रीने सांगितलं झटपट निर्णयामागचं खास कारण
disha pardeshi father emotional story raja shivaji movie
दिशा परदेशी याआधी अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘लाखात एक आमचा दादा’, ‘कन्याकुमारी’ आणि ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ या मालिकांमधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंती दिली होती. आता ‘राजा शिवाजी’मधील तिच्या अभिनयामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र या यशाच्या क्षणी वडिलांची अनुपस्थिती कायम मनाला टोचत राहील, अशी भावना तिने व्यक्त केली.
हे पण वाचा.. अभिनेत्री मुक्ता बर्वे 47 व्या वर्षीही आहे सिंगल का नाही केलं लग्न स्वतःच केला खुलासा!









