tarini serial shital kshirsagar entry siddhirupa karmarkar exit : ‘तारिणी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत असून, कथानकातील सततचे ट्विस्ट आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे मालिकेची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. तारिणी आणि केदार यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असली तरी खांडेकर कुटुंबातील इतर पात्रांनाही तितकेच प्रेम मिळताना दिसत आहे. प्रत्येक पात्राच्या स्वभावात असलेली वेगळी छटा आणि त्यांच्या नात्यांमधील गुंतागुंत मालिकेला अधिक रंजक बनवत आहे.
कथानकात नुकताच एका नव्या ऑफिसरची एन्ट्री झाली. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत नवीन अधिकाऱ्याच्या आगमनाची चर्चा सुरू होती. त्यामुळे ही भूमिका कोण साकारणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर समोर आलेल्या नव्या प्रोमोमधून अभिनेत्री पायल जाधवची मालिकेत एन्ट्री झाल्याचे स्पष्ट झाले. ती हरप्रीत चड्डा उर्फ रेवा ही भूमिका साकारताना दिसत आहे. विशेष म्हणजे रेवा ही केदारची जवळची मैत्रीण असल्याने आगामी भागांमध्ये कथेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मालिकेत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. सुरुवातीपासूनच पद्मिनी काकूंची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री सिद्धीरुपा करमरकर यांनी मालिकेला अलविदा केला आहे. पद्मिनी हे पात्र मालिकेत कायम चर्चेत राहिले. आपल्या मुलगा युवराजसाठी ती कायम आग्रही राहिली. त्याच्यावर अन्याय होऊ नये, कुटुंबात त्याला योग्य स्थान मिळावे आणि त्याच्या आयुष्यात कोणी अडथळा बनू नये, यासाठी ती नेहमी प्रयत्न करताना दिसली. या प्रवासात तिच्या व्यक्तिरेखेत अनेक नकारात्मक छटाही पाहायला मिळाल्या. कधी कटकारस्थान, कधी घरातील वाद, तर कधी भावनिक प्रसंगांमुळे पद्मिनी काकूंची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.
आता सिद्धीरुपा करमरकर यांच्या जागी अभिनेत्री शीतल क्षीरसागर ही भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. शीतलच्या एन्ट्रीमुळे मालिकेत नवा रंग भरला जाणार असल्याचे बोलले जात आहे. शीतल क्षीरसागर याआधी ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकल्या होत्या. त्या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या अभिनयशैलीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
शीतलने या नव्या प्रवासाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेकांनी झी मराठीवरील त्यांच्या पुनरागमनाचे स्वागत केले, तर काहींनी पद्मिनी काकूंच्या भूमिकेत त्या काय नवीन घेऊन येणार याबाबत उत्सुकता व्यक्त केली.
हे पण वाचा.. सखीने मागितला कान्हाकडे घटस्फोट! ‘लपंडाव’ मालिकेच्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
tarini serial shital kshirsagar entry siddhirupa karmarkar exit
आता शीतल क्षीरसागरच्या एन्ट्रीनंतर ‘तारिणी’ मालिकेतील समीकरणे कशी बदलणार आणि पद्मिनी काकूंच्या व्यक्तिरेखेत कोणते नवे पैलू पाहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा.. तू ही रे माझा मितवा” मालिकेच्या प्रोमोमध्ये भावनिक वळण; अर्णव–वडिलांच्या भेटीने उलगडणार नात्यांचे सत्य









