bigg boss marathi 6 rakhi sawant vad nomination : बिग बॉस मराठी ६ च्या घरात दिवसेंदिवस वातावरण अधिकच तापत चाललं आहे. ३८व्या दिवशी झालेल्या घडामोडींनी प्रेक्षकांना अक्षरशः धक्का दिला. सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन जाहीर झाल्यानंतर घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असतानाच राखी सावंतने केलेल्या प्रकारामुळे वाद आणखी वाढला.
या आठवड्यात एकूण नऊ सदस्य एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले आहेत. सचिन कुमावत, राकेश बापट, प्रभू शेळके, अनुश्री माने, रोशन भजनकर, सागर कारंडे, दिपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे आणि रुचिता जामदार यांच्यावर यावेळी घराबाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. नॉमिनेशननंतर आधीच अस्वस्थ झालेल्या घरात राखी सावंतच्या वागणुकीने आगीत तेल ओतल्यासारखी परिस्थिती झाली.
सध्या बिग बॉसने घराची जबाबदारी राखीच्या हाती दिल्यामुळे ती घरातील सदस्यांवर आपला अधिकार गाजवत असल्याचं दिसून येत आहे. याच दरम्यान तिने प्राजक्ताला झाडू मारून घर स्वच्छ करण्याचा आदेश दिला. मात्र, प्राजक्ताने एकटीने काम करण्यास स्पष्ट नकार दिला. हाच नकार राखीच्या रागाचा भडका उडवणारा ठरला.
रागाच्या भरात राखी थेट किचनमध्ये गेली आणि तिथून पीठ आणून सोफ्यावर बसलेल्या प्राजक्ताच्या तोंडावर फेकलं. हा प्रकार पाहून घरातील इतर सदस्य संतप्त झाले. विशेषतः सचिन कुमावत आणि सागर कारंडे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. सागरने राखीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र राखी कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. “तुम्ही सगळे माझ्या पायाखाली आहात,” असं विधान करत तिने वाद आणखी चिघळवला.
भांडण अधिकच वाढल्यानंतर संतापलेल्या सचिनने राखीच्या तोंडावर पाणी फेकलं. या घटनेनंतर राखीचा संयम पूर्णपणे सुटला. रागाच्या भरात तिने डायनिंग टेबलजवळची खुर्ची उचलून खाली पाडली, ज्यामुळे बिग बॉसच्या घरातील मालमत्तेचं नुकसान झालं.
हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. गेल्या आठवड्यातही राखीने रागाच्या भरात भांडी फोडली होती, ज्यामुळे तिला कॅप्टनपदाच्या शर्यतीतून बाहेर करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा नियमभंग आणि प्रॉपर्टी डॅमेज केल्यामुळे बिग बॉस तिच्यावर कोणती कारवाई करणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. झी मराठीवर पुन्हा एकदा वाजणार ‘सनई चौघडे’; मेघना एरंडेच्या दमदार पुनरागमनासह नव्या मालिकेची जोरदार चर्चा
एकीकडे नॉमिनेशनची धाकधूक आणि दुसरीकडे घरातील वाढते वाद यामुळे Bigg Boss Marathi 6 सध्या अत्यंत रंगतदार टप्प्यावर पोहोचला आहे. राखीच्या या वागणुकीचा खेळावर नेमका काय परिणाम होणार, आणि तिला यावेळी किती मोठी शिक्षा मिळणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. अखेर गैरसमज दूर! ठरलं तर मग मालिकेत अर्जुन-सायली पुन्हा मूळ भूमिकेत; माफी, समजूत आणि भावनिक संवाद









