savalyachi janu savli suranchi jugalbandi promo : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Savalyachi Janu Savali सध्या एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. सावलीच्या आयुष्यात संगीताच्या नव्या प्रवासाची सुरुवात होत असतानाच, भैरवीसोबतचा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतो आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे हीच उत्सुकता शिगेला पोहोचली असून, सावली आणि भैरवी यांच्यातील थेट सुरांची जुगलबंदी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मालिकेच्या कथानकानुसार सावली लवकरच तिचं पहिलं गाणं रेकॉर्ड करताना दिसणार आहे. या महत्त्वाच्या टप्प्यावर तिला प्रसिद्ध गायिका राधिका भिडेची साथ लाभणार आहे. राधिकाची मालिकेत होणारी एन्ट्री सावलीसाठी प्रेरणादायी ठरणार असली, तरी भैरवी मात्र तिच्या यशात अडथळे आणण्याचा एकही मौका सोडताना दिसत नाही. साउंड रेकॉर्डिंगदरम्यान मुद्दाम गोंधळ निर्माण करण्यासाठी भैरवी चुकीच्या लोकांशी हातमिळवणी करते आणि सावलीचं गाणं बिघडवण्याचा प्रयत्न करते.
या सगळ्या कटकारस्थानांच्या पार्श्वभूमीवर आता Savalyachi Janu Savali चा नवा प्रोमो समोर आला आहे, ज्यात सावली थेट भैरवीला सुरांच्या जुगलबंदीसाठी आव्हान देते. गुरू आणि शिष्य आमनेसामने येणार, हे पाहून भैरवी चिडते आणि गुरू नेहमीच शिष्यापेक्षा श्रेष्ठ असतो, हे तिला आठवण करून देते. मात्र यावेळी सावली एकटी नसते.
या निर्णायक क्षणी सावलीच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहतो तिचा नवरा सारंग. “आज सावली फक्त गाणार नाही, तर गरजणार सुद्धा,” असं तो ठामपणे सांगतो आणि सावलीचा आत्मविश्वास आणखी वाढतो. पतीचा आधार, स्वतःवरचा विश्वास आणि संगीताची ताकद यामुळे सावली आता भैरवीसमोर डगमगणार नाही, हे स्पष्ट होतं.
प्रोमो पाहून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला असून, या जुगलबंदीमुळे मालिकेत आणखी सुंदर आणि भावपूर्ण गाणी ऐकायला मिळतील, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. प्राइम टाइम नसतानाही Savalyachi Janu Savali ने स्वतःचा मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. रोज सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित होणारी ही मालिका सध्या संगीत, नातेसंबंध आणि संघर्ष यांचा सुंदर मिलाफ दाखवत आहे.
हे पण वाचा.. खेळ पलटणार! लक्ष्मी निवासच्या नव्या प्रोमोमध्ये जान्हवीचा निर्धार, जयंतला थेट आव्हान
आता या सुरांच्या लढतीत सावली बाजी मारणार की भैरवी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी खूपच रंजक ठरणार आहे.
हे पण वाचा.. मी कमळी राजन महाजन… कमळी मालिकेत अन्नपूर्णा आजींच्या मोठ्या नातीची दणक्यात एन्ट्री, सगळं चित्रच बदलणार







