Milind Gawali Subodh Bhave: अभिनेता मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे आपल्या मनातील भावना व्यक्त करणारी आणखी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे याबद्दल मनापासून कौतुक व्यक्त केलं आहे. दोघेही आपल्या अभिनयासाठी ओळखले जातात, पण विशेष म्हणजे आजवर त्यांनी एकत्र काम केलेलं नाही. मात्र, तरीही मिलिंद गवळी यांनी सुबोधविषयी असलेला आदर आणि आपुलकी शब्दांत मांडली आहे.
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये मिलिंद यांनी लिहिलं की, “सुबोध भावेबरोबर काम करण्याची संधी आजवर मिळाली नाही, पण ती मिळाली असती तर नक्कीच आनंद झाला असता. स्वप्ना जोशी वाघमारे यांच्यासोबत आम्ही दोघांनी अनेकदा काम केलं आहे, पण एकत्र पडद्यावर येण्याचा योग कधीच आला नाही.”
ते पुढे म्हणाले की, “मी अनेक वर्षांपासून सुबोधचा प्रवास पाहत आलोय. मराठी उद्योगात अनेक कलाकार एकाच धाटणीच्या भूमिकांमध्ये अडकून पडतात, पण सुबोध भावे मात्र प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा आणतात. ‘बालगंधर्व’, ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘फुगे’ आणि ‘पेशवाई’मधील पहिला बाजीराव पेशवा अशी त्यांची कामगिरी आजही लक्षात राहणारी आहे.”
गेल्या काही दिवसांत कोल्हापूरमध्ये झालेल्या पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रमात हे दोघे एकत्र आले. त्या वेळी झालेल्या गप्पांदरम्यान सुबोधच्या सकारात्मक ऊर्जेचा आणि स्पष्टवक्तेपणाचा अनुभव आल्याचं मिलिंद यांनी सांगितलं. त्यांनी लिहिलं, “सुबोधचं बेधडकपणे मत मांडणं मला सर्वाधिक आवडतं. हे मला आयुष्यात कधीच जमत नाही, पण सुबोधनं ते नेहमीच प्रामाणिकपणे केलं आहे.”
मिलिंद यांनी पुढे सांगितलं की, सुबोध भावे फक्त एक उत्कृष्ट कलाकार नाहीत, तर समस्यांचे निराकरण करणारे संवेदनशील व्यक्ती आहेत. थिएटरमधील एका समस्येवर त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कलाकारांना मोठी सुविधा मिळाली, हे उदाहरण देत त्यांनी सुबोधचं कौतुक केलं. या पोस्टवर स्वतः सुबोध भावे यांनी प्रतिक्रिया देत लिहिलं, “मित्रा, खूप प्रेम! तुझ्याबरोबर काम करणं हे आता माझं नवीन ध्येय आहे.” या दोघांच्या संवादाने चाहत्यांमध्ये चर्चेचं वातावरण निर्माण झालं असून, अनेकांनी या दोघांना एकत्र पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तेजश्री प्रधानचा नववधूप्रमाणे लूक सोशल मीडियावर व्हायरल; चाहत्यांनी केली कमेंट्सची बरसात









