ADVERTISEMENT

तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये रोशन सोढीची पुनरागमनाची शक्यता? गुरुचरण सिंह Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील रोशन सोढी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गुरुचरण सिंह पुन्हा मालिकेत परतणार असल्याचे संकेत देत आहे. त्याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले असून “खूप चांगली बातमी लवकरच सांगणार” असे सांगितले आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेबाबत पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. त्यातीलच एक महत्त्वाचं पात्र म्हणजे रोशन सोढी, ज्याची भूमिका अभिनेता गुरुचरण सिंह यांनी साकारली होती. काही वर्षांपूर्वी त्यांनी अचानक मालिकेला निरोप दिला आणि त्यानंतर ते अभिनय क्षेत्रापासून दूर गेले. मात्र, आता असे संकेत मिळत आहेत की ते लवकरच पुन्हा स्क्रीनवर दिसू शकतात.

गुरुचरण सिंह यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ते आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना म्हणतात, “मी खूप दिवसांनी तुमच्यासमोर आलो आहे. बाबाजींनी माझ्या कुटुंबाच्या आणि तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत. माझ्याकडे एक खूप चांगली बातमी आहे, जी मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.” त्यांच्या या व्हिडीओनं काही सेकंदातच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

तिनं लग्नच लहानपणी केलं; ‘लपंडाव’ फेम चेतन वडनेरेचं कृतिका देव बद्दल वक्तव्य

चाहत्यांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं, “जर तुम्ही पुन्हा ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये आलात, तर त्यापेक्षा मोठी आनंदाची बातमी दुसरी नाही.” आणखी एका चाहत्यानं कमेंट केली, “याचा अर्थ तुम्ही शोमध्ये परत येत आहात का?” अशा प्रकारच्या शेकडो कमेंट्समध्ये चाहत्यांचा उत्साह स्पष्टपणे दिसतो आहे.

गेल्या वर्षी गुरुचरण सिंह काही काळासाठी बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. जवळपास तीन आठवड्यांनंतर ते स्वतःहून घरी परतले, त्यानंतर त्यांनी पुन्हा सार्वजनिक जीवनात फारसा सहभाग घेतला नाही. मात्र, आता त्यांच्या या नव्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या १७ वर्षांपासून सतत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून, टीआरपीच्या शर्यतीत अजूनही अव्वल स्थानी आहे. अशातच, जर गुरुचरण सिंह उर्फ रोशन सोढी पुन्हा या शोमध्ये दिसले, तर ते निश्चितच जुन्या चाहत्यांसाठी एक मोठं सरप्राईज ठरणार आहे.

गुरुचरणच्या या व्हिडीओमुळे ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’ या मालिकेबद्दलचा उत्साह पुन्हा एकदा ताजातवाना झाला आहे आणि सर्वजण आता एका मोठ्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.