Subodh Bhave And Mansi Naik Marathi Film : मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांना नेहमीच दर्जेदार कथा, नेत्रसुखद दृश्यं आणि सशक्त अभिनय पाहायला आवडतो. त्याच धाटणीचा एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, सुबोध भावे आणि मानसी नाईक यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर अवघ्या काही तासांतच या टीझरला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
टीझरची सुरुवात सुबोध भावेच्या प्रभावी संवादाने होते – “जन्म आपल्या हातात नसतं, असतं ते फक्त जगणं…”. जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी या संवादातून उमटते आणि पुढे संपूर्ण टीझरला तत्त्वज्ञानाची आणि भावनांची सुंदर किनार मिळते. या प्रवासात मानसी नाईकची एन्ट्री होते, जी नायकाला जगण्याचा नवा उत्साह आणि सकारात्मकतेची प्रेरणा देते. या दोन्ही कलाकारांची स्क्रीनवरील केमिस्ट्री, सुबोधचा हटके लूक आणि मानसीचा मोहक अंदाज या सर्व गोष्टींनी टीझर अधिकच उठावदार बनवला आहे.
चित्रपटाचं दिग्दर्शन हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलेले आलोक जैन यांनी केलं आहे. निर्मिती नम्रता सिन्हा यांची असून, श्रेय पिक्चर कंपनीने चित्रपटाची निर्मिती केली आहे. याचं संगीत गायक-संगीतकार रोहित राऊत यांनी दिलं असून गीतकार अभिषेक खणकर यांची गाणी हिमेश रेशमिया मेलोडीज या लेबलखाली रसिकांसमोर येणार आहेत. संवादलेखन ओंकार बर्वे आणि अंकुश मारोडे यांनी केले असून छायांकन सुनील पटेल यांचं आहे. संपूर्ण वितरणाची जबाबदारी सिनेपोलीसने स्वीकारली आहे.
‘नाच मोरा…’ या गाण्याने आधीच या चित्रपटाविषयी रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. आता टीझरमुळे ही उत्सुकता आणखी वाढली आहे. काव्यमय संवाद, हृदयाला भिडणारे प्रसंग आणि भावनांचा सुरेल प्रवास हे या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.
‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. फक्त कथानक नाही तर जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी आणि प्रेक्षकांना भावनिक स्पर्श करणारा अनुभव देईल, असा विश्वास या चित्रपटाच्या टीमला आहे.
हे पण वाचा.. लालबागचा राजा’च्या दरबारात अभिनेत्री अमृता खानविलकरकडून बाप्पाच्या चरणी अर्पण केलं खास दान









