स्टार प्रवाहवरील प्रेक्षकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या रोमांचक टप्प्यात पोहोचली आहे. कथानकाने घेतलेला नवा कलाटणीचा वळण पाहून प्रेक्षक अवाक झाले आहेत. मधुभाऊंच्या शंकेला अखेर पुराव्यांचा आधार मिळत असतानाच त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने वातावरण तंग झाले आहे.
काही दिवसांपूर्वी प्रतिमा आणि रविराज किल्लेदार आश्रमात दाखल झाले होते. तिथेच प्रतिमाला भिंतीवर काढलेलं एक चित्र दिसलं आणि ते तन्वीचं असल्याचं तिनं रविराजला सांगितलं. पण हे ऐकलेले मधुभाऊ थेट जुन्या आठवणींमध्ये हरवले. त्यांनी जुनी वह्या चाळताना लक्षात घेतलं की ते चित्र तन्वीचं नव्हे तर सायलीचं आहे. यामुळे त्यांच्या मनात ठाम विश्वास बसला – सायली हीच खरी तन्वी किल्लेदार आहे.
या गूढाचा उलगडा करण्यासाठी मधुभाऊंनी थेट सुभेदारांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. योगायोगाने तिथं दहीहंडीचा उत्सव सुरू होता. सर्व जण आनंदाने उत्सवात गुंग असतानाच मधुभाऊ भूतकाळातील पुरावे शोधत होते. शेवटी त्यांच्या हाताला एक बालपणीचा फोटो लागला. त्या फोटोतली मुलगी दुसरी कोणी नसून सायलीच होती. यानंतर मधुभाऊंचा संशय निश्चिततेत बदलला.
मात्र, याच क्षणी त्यांच्यावर काळाने घाला घातला. नागराज बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या मागावर होता. सायलीची खरी ओळख उघड झाल्याचं कळताच त्याने कुठलाही विलंब न करता मधुभाऊंवर प्राणघातक हल्ला केला. या धक्कादायक घटनेनं सुभेदार कुटुंबात खळबळ उडाली.
अर्जुनला ही गोष्ट कळताच तो ताबडतोब मधुभाऊंकडे धाव घेतो. अद्वैतनंही कसाबसा स्वतःचा जीव वाचवून अर्जुनला परिस्थिती समजावली. मधुभाऊंना तातडीने रुग्णालयात दाखल केलं जातं, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं.
या सगळ्या घटनांमुळे सायली पूर्णपणे खचून जाते. पण ती दु:खावर मात करून रणरागिणीचा अवतार घेते. आपल्या वडिलांवर हल्ला झाल्यानंतर ती थेट महिपतकडे धडकते. संतापाच्या भरात ती महिपताला म्हणते – “माझे मधुभाऊ तुझ्यामुळे कोमात गेलेत महिपत! त्यांना नव्यानं आयुष्य सुरू करायचं होतं, पण तू सगळं हिरावून घेतलंस. अजून किती जणांचा जीव घेणार आहेस?”
सायलीचा हा आक्रोश ऐकून महिपत संतापतो आणि तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न करतो. पण त्याक्षणी अर्जुन पुढे येतो आणि महिपतचा गळा दाबतो. यामुळे संघर्ष आणखीन तीव्र होतो.
आता प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे – मधुभाऊ या जीवघेण्या हल्ल्यातून सुखरूप बाहेर येतील का? त्यांना शुद्ध आल्यावर जुन्या आठवणी परत मिळतील का? की त्यांच्या आठवणी कायमच्या हरवतील?
Gashmeer Mahajani ची क्रश कोण? अभिनेता म्हणतो, “आतासुद्धा माझ्यासाठी खास…
हा धक्कादायक आणि भावनांनी भारलेला भाग येत्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या या वळणानं कथानकात नवा ताणतणाव निर्माण केला असून, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.









