Zee Marathi New Serials: Sanai Chaughade and Deep Jyoti Coming Soon : मराठी मनोरंजन विश्वात Zee Marathi ही वाहिनी सातत्याने दर्जेदार आणि लोकप्रिय मालिकांसाठी ओळखली जाते. सध्या वाहिनीवरील अनेक मालिका टीआरपीच्या शर्यतीत भक्कम कामगिरी करताना दिसत आहेत. ‘तारिणी’, ‘देवमाणूस’ आणि ‘तुला जपणार आहे’ यांसारख्या मालिकांनी आपल्या-आपल्या वेळच्या स्लॉटमध्ये आघाडी घेतली असून प्रेक्षकांचा मजबूत प्रतिसाद मिळवत आहेत. या यशानंतर Zee Marathi आता आणखी नव्या कथा घेऊन सज्ज झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच Zee Marathi ने वल्लरी विराज यांच्या ‘शुभ श्रावणी’ या आगामी मालिकेची घोषणा केली होती. मात्र, त्या मालिकेचा वेळ आणि इतर तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत. अशातच वाहिनीने आणखी दोन नव्या मालिकांची माहिती समोर आणली असून त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या दोन नव्या मालिकांची नावं आहेत ‘सनई चौघडे’ आणि ‘दीप ज्योती’.
‘सनई चौघडे’ ही मालिका चार मुली आणि त्यांच्या आयुष्याभोवती फिरणाऱ्या भावनिक, सामाजिक प्रश्नांवर आधारित असल्याचं प्रोमोमधून स्पष्ट होतं. आजच्या काळात योग्य जोडीदार शोधणं किती अवघड झालं आहे, विचार जुळतील का, नातं टिकेल का, असे अनेक प्रश्न या कथेतून समोर येणार आहेत. आईच्या मनातील काळजी, जबाबदारी आणि मुलींच्या भविष्याचा विचार या सगळ्या भावना या मालिकेत संवेदनशील पद्धतीने मांडल्या जाणार असल्याचं संकेत मिळतात. “प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो” हा संवाद प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे.
दुसरीकडे, ‘दीप ज्योती’ ही मालिका पूर्णपणे वेगळ्या धाटणीची कथा घेऊन येत आहे. एका घरात दोन सुना आणि त्यांच्यातील विरुद्ध स्वभाव यावर ही मालिका आधारलेली आहे. एक सून सूडाच्या भावनेतून नात्यांमध्ये अंधार निर्माण करते, तर दुसरी सून प्रेम, समजूतदारपणा आणि विश्वासाने नात्यांची ज्योत उजळवते, असा प्रभावी संदेश प्रोमोमधून देण्यात आला आहे. या कथेतून प्रेक्षकांना भावनिक संघर्ष, नात्यांची गुंतागुंत आणि सकारात्मकतेचा विजय पाहायला मिळणार आहे.
या दोन्ही मालिकांमध्ये कोणते कलाकार झळकणार आणि त्या नेमक्या कोणत्या वेळेला प्रसारित होणार, याबाबत ZeeMarathi कडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, लवकरच वाहिनी याची माहिती देईल, असं संकेत मिळत आहेत. याशिवाय, ZeeMarathi वर ‘झी मराठी दुपार’ हा नवा सेगमेंट सुरू होणार असल्याने दुपारच्या स्लॉटमध्येही नवीन मालिका येण्याची शक्यता आहे. सध्या त्या वेळेत जुन्या लोकप्रिय मालिकांचं पुनःप्रसारण सुरू आहे.
हे पण वाचा.. पारू मालिका फेम अभिनेता प्रसाद जवादेवर दुःखाचा डोंगर; आई प्रज्ञा जवादेंचे निधन
दरम्यान, ‘सनई चौघडे’ आणि ‘दीप ज्योती’ या दोन्ही मालिकांच्या प्रोमोला सोशल मीडियावर भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या नव्या कथा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा प्रेक्षक व्यक्त करत आहेत. ZeeMarathi च्या आगामी प्रवासात या दोन्ही मालिका नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतील, यात शंका नाही.
हे पण वाचा.. ‘धुरंधर’ची जादू कायम! मालिकेतील अभिनेत्याने गायलेलं गाणं ठरतंय सोशल मीडियावर हिट







