yogita chavan new serial tu anolakhi tari sobati promo : छोट्या पडद्यावर येणाऱ्या नव्या मालिकांचा हंगाम सुरू असताना, मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा पुन्हा चर्चेत आला आहे. ‘जीव माझा गुंतला’ आणि ‘बिग बॉस मराठी’मुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री योगिता चव्हाण काही काळाच्या विश्रांतीनंतर नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येत आहे.”तू अनोळखी तरी सोबती” (Tu Anolakhi Tari Sobati) असे शीर्षक असलेली ही मालिका लवकरच सन मराठीवर झळकणार असून तिचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.
योगिता या मालिकेत अर्पिता हे पात्र साकारत आहे. तिच्यासोबत अभिनेता अंबर गणपुळे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘दुर्गा’सारख्या मालिकांमध्ये विशेष ठसा उमटवणारा अंबर या मालिकेत समीरची भूमिका निभावत आहे. नवी जोडी, ताजं कथानक आणि भावनिक वळणांनी भरलेला प्रवास यामुळे मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आधीच निर्माण झाली आहे.
प्रोमोमध्ये दाखवलेला प्रसंग या मालिकेच्या कथानकाचा सुंदर आरंभ दिसतो. मुंबईत राहणारा समीर आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने देवळात बाप्पाच्या दर्शनाला जातो. तो प्रसाद म्हणून विशेष केक घेऊन गुरुजींना देतो आणि ज्या व्यक्तीसाठी हा प्रसाद आहे, त्यांच्यापर्यंत तो पोहोचावा अशी विनंती करतो. त्याच क्षणी मंदिरात येते अर्पिता. गुरुजी तिच्या हातात केक देतात आणि योगायोगाने तोच दिवस अर्पिताचाही वाढदिवस असतो. प्रसादातील हा छोटासा योग दोघांनाही जवळ आणणारा ठरणार हे सूचित करत प्रोमो संपतो. मात्र, ते एकमेकांना अद्याप ओळखतही नसतात. या अनोळखी नात्याच्या ओळखीपर्यंतचा प्रवास ‘तू अनोळखी तरी सोबती’मध्ये अनुभवायला मिळणार आहे.
ही नवी मालिका ५ जानेवारी २०२६ पासून सन मराठीवर प्रसारित होणार असून मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी प्रोमोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. योगिताची मैत्रीण अंकिता वालावलकर, अंबरची पत्नी शिवानी सोनार, निखिल दामले, अक्षया नाईक, सुमीत पुसावळे, अनघा अतुल आदी कलाकारांनी टीमचे अभिनंदन करत मालिकेबद्दलचा आनंद व्यक्त केला आहे.
हे पण वाचा.. लग्नानंतर अनुष्काने शेअर केले जाधव कुटुंबासोबतचे पहिले फोटो; सत्यनारायण पूजेची खास झलक वायरल!
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सुरू होणारी ‘तू अनोळखी तरी सोबती’ ही मालिका प्रेक्षकांना एका ताज्या, भावपूर्ण आणि वेगळ्या प्रेमकथेचा अनुभव देण्याचं आश्वासन देते.
हे पण वाचा.. लक्ष्मीच्या पाऊलांनी मध्ये मोठा उलगडा! अद्वैतला कळलं कलाच्या मृत्यूचं खरं कारण









