tharala tar mag serial love politics new twist : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Tharala Tar Mag सध्या कथानकातील वेगवान घडामोडींमुळे प्रेक्षकांच्या विशेष चर्चेत आहे. आजच्या भागात एकीकडे प्रेमाचे गोड क्षण अनुभवायला मिळतात, तर दुसरीकडे काही पात्रांचे काळे विचार भविष्यात मोठा संघर्ष निर्माण करणार असल्याचे संकेत मिळतात.
अर्जुन आणि सायलीच्या नात्याला आज एक नवं वळण मिळालं. अर्जुनने सायलीला मनापासून रोमँटिक पद्धतीने प्रपोज केलं. प्रेमाची कबुली देताना त्याने तिला अंगठी घातली, ज्यामुळे सायली अक्षरशः आनंदात न्हाऊन निघाली. एवढंच नाही तर अर्जुनने सायलीसाठी खास कविता लिहिल्याचंही समोर आलं. हा क्षण दोघांसाठीच खास ठरतो. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी घरात वातावरण थोडं बदललेलं दिसतं. अस्मिता नेहमीप्रमाणे अर्जुनची थट्टा करते, तर कल्पना मुद्दाम त्याला सायलीला प्रपोज केलंस का, असा प्रश्न विचारते. अर्जुन मात्र सगळं लपवण्याचा प्रयत्न करत “काहीच नाही” असं उत्तर देतो.
दरम्यान, चॉकलेट डे निमित्त अस्मिता अर्जुनला घरीच चॉकलेट बनवायला सांगते. सायली घरात येताच सगळे जण अचानक गप्प होतात, ज्यामुळे सायलीला काहीतरी लपवलं जात असल्याची जाणीव होते. पुढे सायली आणि चैतन्य कामासाठी निघताना अर्जुनने लिहिलेलं पत्र तिच्या हातातून खाली पडतं. त्यात असलेली कविता सगळ्यांसमोर वाचली जाते आणि अर्जुन-सायलीचं नातं अधिकच खुलतं.
दुसरीकडे, मालिकेतील साक्षीचा ट्रॅक मात्र अधिकच धोकादायक वळण घेतो. साक्षी अचानक सचिनला मिठी मारते आणि त्याच्यावरचा आपला पूर्ण विश्वास असल्याचं सांगते. सचिनही निरागसपणाचं नाटक करत तिच्या शब्दांना दुजोरा देतो. मात्र सचिनच्या खऱ्या स्वभावाची कल्पना असूनही साक्षी गप्प राहते. उलट, सचिनच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झालेली साक्षी अस्मिताला त्याच्या आयुष्यातून काढून टाकण्याचा निर्धार करते. तिचे विचार पुढील भागांसाठी मोठा तणाव निर्माण करणारे ठरणार आहेत.
याच दरम्यान अर्जुन सायलीसाठी खास चॉकलेट तयार करतो. तिचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून बनवलेली ही गोड भेट त्याच्यासाठीही आनंदाची ठरते. मात्र हा आनंद फार काळ टिकणार नाही, याची चाहूल प्रिया देते. अर्जुन आणि कल्पनाचं बोलणं ऐकून प्रिया सायलीच्या आनंदावर पाणी फेरण्याचा निश्चय करते.
हे पण वाचा.. गुलाब, लाल साडी आणि बोल्ड अदा! व्हॅलेंटाईनला जान्हवी किल्लेकरचा खास अंदाज
एकूणच Tharala Tar Mag च्या आगामी भागांमध्ये प्रेम, विश्वासघात आणि कटकारस्थान यांचा भन्नाट मेळ पाहायला मिळणार आहे. अर्जुन-सायलीचं नातं टिकणार की साक्षी आणि प्रियाचे डाव त्यात अडथळे आणणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे.









