tharala tar mag nava promo suman mahipat nagraj : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Tharala Tar Mag ने नुकताच तीन वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. याचबरोबर मालिकेने १००० भागांचा टप्पाही गाठत प्रेक्षकांच्या पसंतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. या संपूर्ण काळात ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत कायम आघाडीवर राहिली. कथानकात वेळोवेळी उभ्या राहिलेल्या रहस्यांनी आणि त्यामागच्या सत्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. आता हीच रहस्यं एकामागोमाग एक उलगडताना दिसत असून कथेला वेगळीच कलाटणी मिळत आहे.
सायली आणि अर्जुन एकत्र येत अनेक लपलेली सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नागराज आणि महिपत यांच्यातील नातेसंबंध पूर्णपणे बदललेले पाहायला मिळतात. एकेकाळी जिवलग मित्र असलेले हे दोघे आता कट्टर शत्रू बनले आहेत. प्रियामुळे दोघांमध्ये गैरसमज वाढले आणि विश्वासाचं नातं पूर्णपणे तुटलं. सध्या परिस्थिती अशी आहे की महिपत शिखरे नागराजच्या ताब्यात असून तो त्याच्यावर दबाव टाकत असल्याचं संकेत मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वी नागराजच्या पत्नीने त्याची खरी बाजू सायली आणि अर्जुनसमोर मांडली होती. नागराज अजूनही महिपतशी संपर्कात असल्याची धक्कादायक माहितीही तिने दिली. यानंतर नागराजवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सायलीने सुमनकडे सोपवली होती. हाच धागा पुढे नेत Tharala Tar Mag च्या नव्या प्रोमोमध्ये सुमन नागराजचा पाठलाग करत थेट त्या ठिकाणी पोहोचते, जिथे महिपतला किडनॅप करून ठेवण्यात आलं आहे.
त्या ठिकाणी नागराज महिपतवर दादागिरी करताना दिसतो आणि हे दृश्य पाहून सुमन हादरून जाते. दुसरीकडे, सुभेदारांच्या घरी नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असल्यामुळे घरात प्रचंड गोंधळ असतो. सुमनला तात्काळ सायलीला सगळी माहिती द्यायची असते, पण फोनवर संपर्क होत नाही. अखेर सायली फोन उचलते आणि सुमन काहीतरी महत्त्वाचं सांगते, मात्र नेमकं काय बोलणं झालं हे प्रोमोमध्ये उघड करण्यात आलेलं नाही. फक्त सायलीच्या चेहऱ्यावरचा धक्का पाहून मोठा खुलासा होणार असल्याचं संकेत मिळतात.
हे पण वाचा.. स्टार प्रवाहवर मोठा बदल! ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ मालिकेचा प्रवास संपला
आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सुमन नागराजचं सत्य उघड करताना स्वतः अडचणीत सापडणार का? नागराज तिला पाहणार का आणि तिच्या जीवाला धोका निर्माण होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या भागांमध्ये मिळणार असून Tharala Tar Mag ची कथा आणखी रंगतदार होणार, यात शंका नाही.
हे पण वाचा.. 2025 प्राजक्ता माळीसाठी कसं होतं? प्राजक्ता माळी चा भावूक रीकॅप व्हिडीओ









