Tejaswini Lonari Engagement : मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराईचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. नुकतेच अभिनेत्री अमृता माळवदकरने विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली, तर काही दिवसांपूर्वी ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेता अमित रेखी आणि अभिनेत्री शिवानी नाईक यांच्या साखरपुड्याने चाहत्यांचे लक्ष वेधले होते. आता या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, आणि ते म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचे.
‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘देवमाणूस’ आणि अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी तेजस्विनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी कारण आहे तिचं वैयक्तिक आयुष्य. तेजस्विनीचा साखरपुडा रविवारी, २६ ऑक्टोंबर रोजी, मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये अत्यंत थाटामाटात पार पडला. या समारंभाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
तेजस्विनीचा होणारा जोडीदार म्हणजे शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर, हे शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र आहेत. लग्नानंतर तेजस्विनी एका राजकीय घराण्यात सून म्हणून प्रवेश करणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर या बातमीची जोरदार चर्चा रंगली आहे.
साखरपुड्याच्या सोहळ्यात तेजस्विनीने परंपरागत लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधले. लाल रंगाची आकर्षक साडी, गळ्यात नाजूक हार, आणि हिरव्या बांगड्यांचा चुडा – या लूकमध्ये ती अगदी पारंपरिक मराठी नवरीसारखी दिसत होती. तिच्या या लूकचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या समारंभाला अभिनेता सिद्धार्थ जाधवसह मनोरंजनविश्वातील अनेक प्रसिद्ध चेहरे उपस्थित होते.
तेजस्विनी लोणारी केवळ अभिनेत्री नाही तर निर्माती म्हणूनही ओळखली जाते. ती ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’, ‘गुलदस्ता’, ‘अफलातून’ यांसारख्या चित्रपटांत दिसली असून, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही तिने आपली छाप उमटवली होती.
हे पण वाचा.. क्रांती रेडकरचा भन्नाट किस्सा! वडिलांनीच ओळखलं नाही स्वतःच्या लेकीला
सध्या चाहत्यांना सर्वाधिक उत्सुकता आहे ती तिच्या लग्नसोहळ्याची तारीख कधी जाहीर होणार याची. मात्र, साखरपुड्याच्या या उत्साही क्षणांमुळे तिच्या आयुष्यातील नवी पायरी सुरू झाल्याचे निश्चित आहे. तेजस्विनी लोणारीच्या या खास क्षणांसाठी संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हे पण वाचा.. महेश मांजरेकर यांनी उघड केला राज ठाकरेंवरील अपूर्ण बायोपिकचा किस्सा; ‘बुद्धिबळ’ हे होतं खास नाव









