suchitra bandekar vidya balan jahirat kissa : मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी नुकताच त्यांच्या करिअरमधला एक खास किस्सा शेअर केला आहे. अभिनयाच्या जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करूनही त्यांनी फारशा जाहिरातींमध्ये काम केले नाही. त्यामागचं कारण त्यांनी एका मुलाखतीत उलगडलं असून, यात बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचाही उल्लेख आहे.
१९९४ मध्ये अभिनयाला सुरुवात केलेल्या सुचित्रा बांदेकर यांनी ‘हम पांच’, ‘अवंतिका’, ‘वहिनीसाहेब’ अशा लोकप्रिय मालिकांपासून ते अलीकडच्या ‘मनपसंद की शादी’ मालिकेत काम केलं आहे. तसेच ‘बाईपण भारी देवा’ सारख्या हिट मराठी सिनेमातून त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली. मात्र जाहिरातींच्या क्षेत्रात त्यांना वारंवार रिजेक्शनला सामोरं जावं लागलं.
राजश्री मराठीशी बोलताना सुचित्रा म्हणाल्या, “करिअरमध्ये अनेकदा मला जाहिरातींसाठी शॉर्टलिस्ट केलं जायचं, पण शेवटी काम दुसऱ्याच एखाद्या कलाकाराला मिळायचं. त्या काळात विद्या बालन खूप जाहिराती करत होती. आम्ही ‘हम पांच’ मध्ये एकत्र होतो म्हणून माझ्याकडे तिचा नंबर होता. एकदा मी होंडाच्या जाहिरातीसाठी ऑडिशन दिली होती आणि मला शॉर्टलिस्ट झाल्याचा फोन आला. पण पुढचे काही दिवस काहीच प्रतिसाद आला नाही. मग मी थेट विद्यालाच फोन केला आणि विचारलं – ‘शॉर्टलिस्ट झाल्यानंतर कसं कळतं फायनल झालंय का?’ त्यावर विद्या म्हणाली – ‘सुचि, मीच त्या जाहिरातीसाठी फायनल झालेय. पण तू निराश होऊ नकोस. ऑडिशन्स देत राहा, तुला नक्की काम मिळेल.’”
या अनुभवामुळे त्यांना जाहिरातींच्या क्षेत्रात फारसा रस वाटला नाही आणि पुढे त्यांनी त्याकडे पाठ फिरवली. तरीही सुचित्रा बांदेकर यांनी टेलिव्हिजन आणि सिनेमांमधील अभिनयातून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
हे पण वाचा.. साखरपुड्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला सोशल मीडियावर शेअर केले खास क्षण
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर सुचित्रा बांदेकर या मराठीतील लोकप्रिय होस्ट आदेश बांदेकर यांच्या पत्नी आहेत. बांदेकर दाम्पत्याने ‘सोहम प्रोडक्शन्स’ नावाची निर्मिती संस्था उभारली आहे, ज्याच्या अंतर्गत स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ ही हिट मालिका आली होती.
सुचित्रा बांदेकरांचा हा किस्सा ऐकून अनेक तरुण कलाकारांना प्रेरणा मिळते की रिजेक्शन म्हणजे करिअरचा शेवट नसतो. उलट ते पुढे जाण्याचं पाऊल ठरू शकतं.
हे पण वाचा.. साधी माणसं फेम अभिनेता आकाश नलावडे लग्नानंतर दोन वर्षांनी होणार बाबा वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली खास बातमी









