subodh bhave supports society for 25 months Donation : मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख आणि संवेदनशील कलाकार म्हणून ओळखला जाणारा सुबोध भावे (Subodh Bhave) नुकताच आपल्या आयुष्यातील दोन मोठ्या टप्प्यांचा उत्सव साजरा करताना दिसला. त्याचा ५०वा वाढदिवस आणि अभिनय क्षेत्रातील २५ वर्षांचा प्रवास या दोन्हींचा सोहळा नुकताच अत्यंत आत्मीयतेने पार पडला. या विशेष क्षणी सुबोधने केवळ आनंद साजरा केला नाही, तर समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून एक प्रेरणादायी निर्णय घेतला.
या संस्मरणीय सोहळ्यात सुबोध भावेसोबत अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद नीहलानी, अभिनेता अशोक सराफ, तसेच उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी या क्षणाचा आनंद घेतला. सोशल मीडियावर सुबोध भावेने या दिवसाचे काही फोटो शेअर करत आपले मनोगत व्यक्त केले. त्याने लिहिलं की, “कालचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. माझ्या प्रवासात ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे.”
या खास निमित्ताने सुबोध भावेने जाहीर केलं की, पुढील २५ महिन्यांपर्यंत तो दर महिन्याला महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांना आर्थिक सहाय्य देणार आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा बीड जिल्ह्यातील शांतीवन संस्थेपासून सुरू झाला आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या संस्थेच्या नागरगोजे सरांना पहिला धनादेश सुपूर्द करण्यात आला.
सुबोध भावेने या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितलं की, “आपण केलेली मदत जाहीर करण्याची गरज नसते, पण यावेळी जाहीर करतोय कारण त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळावी. समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांना आपल्या मदतीचा थोडा हातभार लागावा, हीच इच्छा.” त्याने पुढे सर्व चाहत्यांना आवाहन करत सांगितले की, “शांतीवनसाठी किंवा इतर संस्थांसाठी तुम्हालाही मदत करावीशी वाटली, तर जरूर करा. तुमचं योगदान आयकर कायदा 80G नुसार करमुक्त असेल.”
हे पण वाचा.. अभिनेता प्रतीक देशमुख आणि श्रुती भोसले यांचा राजेशाही विवाह सोहळा; सोशल मीडियावर शेअर केला वेडिंग अल्बम
या उपक्रमामुळे सुबोध भावे केवळ एक अभिनेता नाही, तर समाजाप्रती कृतज्ञ असलेला जबाबदार नागरिक म्हणूनही पुढे आला आहे. चाहत्यांनी त्याच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून, “आपला आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम राहू दे,” अशा भावनिक शब्दांत सुबोधने आपला संदेश संपवला.
हे पण वाचा.. हा संसार नाही, ही तडजोड आहे!’ — समर आणि स्वानंदीची अनोखी सप्तपदी; ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये नव्या वळणाची चाहूल







