ADVERTISEMENT

“ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करायला शिकलंय मी…” – स्पृहा जोशीचं मनोगत सोशल मीडियावरील नकारात्मकतेवर खुलं वक्तव्य

spruha joshi speaks on online trolling :
spruha joshi speaks on online trolling

spruha joshi speaks on online trolling : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या कवितांमुळे आणि विचारशील व्यक्तिमत्त्वामुळेही ओळखली जाते. दूरदर्शन मालिकांपासून ते रंगभूमीपर्यंत तिच्या सशक्त भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप पाडली आहे. मात्र, अलीकडे ती तिच्या अभिनयापेक्षा एका स्पष्ट आणि थेट वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

बीबीसी मराठीला दिलेल्या एका खास मुलाखतीत स्पृहा जोशीने सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि नकारात्मक कमेंट्सबाबत मोकळेपणाने मत व्यक्त केलं. तिने सांगितलं की, “सोशल मीडिया हे दुधारी अस्त्र आहे. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आम्ही कलाकार त्याचा वापर आमच्या कामाच्या प्रचारासाठी, प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी करतो. पण याच माध्यमातून काही लोक नकारात्मकतेचा प्रसार करतात, ज्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न नेहमीच राहतो.”

स्पृहा पुढे म्हणाली की, सोशल मीडियावर अनेकदा लोकांना थेट समोर येऊन काही बोलण्याची हिंमत नसते, पण पडद्यामागे ते निर्भीडपणे टीका करतात. “रिकामा वेळ असतो, म्हणून घाणेरड्या कमेंट्स लिहिल्या जातात,” असं ती म्हणाली. मात्र अशा वागणुकीकडे दुर्लक्ष करणे हेच योग्य असल्याचं स्पृहाचं ठाम मत आहे.

अनेक वेळा, कलाकारांच्या पोस्टचा मूळ अर्थ बदलून वेगळ्या पद्धतीने सादर केला जातो. त्यावरून नव्या चर्चा सुरू होतात, ज्यात मूळ विषय हरवतो. “क्लिकबेटच्या युगात सगळं काही झपाट्यानं व्हायला लागतं, पण त्याची जबाबदारी कोणाची असते?” असा सवाल स्पृहा जोशीने उपस्थित केला.

तिने स्पष्ट केलं की, प्रत्येक नकारात्मक कमेंटला उत्तर देत बसण्यात काही अर्थ नाही. “मी मला वाटतं ते लिहिते, पोस्ट करते. ज्यांना आवडेल त्यांनी वाचावं, प्रतिक्रिया द्यावी. पण त्यावर नकारात्मक बोललं गेलं तरी त्यात अडकून राहण्याइतकं वेळ आणि उर्जा माझ्याकडे नाही,” असं ती म्हणाली.

हे पण वाचा.. मित्राची बहीण म्हणून थांबलो… पण प्रेम थांबलं नाही!’प्रसाद जवादेने सांगितली अमृता देशमुखसोबतची प्रेमकहाणी, लिव्ह इनपासून लग्नापर्यंतचा प्रवास

सोशल मीडियावरील चांगल्या गोष्टींचाही तिने उल्लेख केला. “या माध्यमामुळे अनेक सुंदर लोक जोडले गेले, प्रेरणादायी गोष्टी घडल्या. त्यामुळे मी नेहमी सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करते,” असं सांगत स्पृहाने नकारात्मक ट्रोलिंगकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं तत्त्व स्वीकारल्याचं स्पष्ट केलं.

तिच्या या विचारसरणीमधून, एक संवेदनशील आणि परिपक्व अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, प्रसिद्धी आणि नकारात्मकतेच्या या काळात शांत राहूनही स्वतःचं अस्तित्व टिकवणं हेच खरं यश आहे.

हे पण वाचा.. “लक्ष्मी निवास” मालिकेचा हृदयस्पर्शी प्रोमो ; जान्हवीच्या जाण्याचं सत्य लक्ष्मी स्वीकारेल का?

spruha joshi speaks on online trolling