मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री Shivani Sonar सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षणांचा आनंद घेत आहे. जानेवारी २०२५ मध्ये अंबर गणपुळे याच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर ती पहिल्यांदाच सासरच्या मंडळींसोबत दिवाळी साजरी करणार आहे. त्यामुळे या वर्षीचा दिवाळी पाडवा तिच्यासाठी विशेष ठरणार आहे.
शिवानीनं एका खास मुलाखतीत या सणाविषयीच्या भावना मोकळ्या केल्या. ती म्हणाली, “लग्नानंतरची पहिली दिवाळी असल्याने सगळंच वेगळं आणि खास वाटतंय. सासरच्या घरात पहिल्यांदाच दिवाळी साजरी करत आहे. सणाच्या तयारीपासून ते सगळ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याची उत्सुकता मनात आहे. पण त्याचबरोबर आई-बाबा आणि भावाचीही खूप आठवण येणार आहे.”
या खास दिवाळी पाडव्याबद्दल बोलताना शिवानीनं हसत सांगितलं, “मी अंबरला आधीच सांगून ठेवलंय की हा पहिला पाडवा आहे, तर मला काहीतरी खास भेट हवी. सरप्राइझ असावं अशी माझी इच्छा आहे.” तिच्या या candid प्रतिक्रियेनं चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
यंदा तिच्यासाठी फक्त पाडवा नव्हे, तर भाऊबीजही खास ठरणार आहे. तिचा भाऊ बंगळुरूमध्ये कामाला लागल्यानंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा तो स्वतःच्या कमाईतून बहिणीला भेट देणार आहे. शिवानीनं सांगितलं, “मी नेहमीच त्याच्यासाठी गोष्टी करत आले. पण आता तो स्वतः कमावतोय आणि मला भेट देणार आहे, ही गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानाची आहे.”
दिवाळीच्या आठवणी सांगताना ती म्हणाली, “लहानपणी आम्ही सगळेजण मिळून किल्ला बनवायचो. त्यासाठी खूप तयारी व्हायची. आता मात्र शूटिंगच्या धावपळीमुळे ते शक्य होत नाही. त्या आठवणी खूप खास आहेत.”
शिवानी सध्या ‘तारिणी’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय आणि तिचं काम प्रेक्षकांना प्रचंड आवडतंय. दिवाळीच्या निमित्तानं तिच्या या खास प्रतिक्रियेमुळे चाहत्यांना तिच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण जवळून पाहायला मिळाले आहेत.
हे पण वाचा.. Ankur Wadhave दुसऱ्यांदा झाला बाबा! दिवाळीच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी
यंदा पाडव्याला Shivani Sonar हिला नवऱ्याकडून कोणती सरप्राइझ भेट मिळते, याची चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लग्नानंतरची ही पहिली दिवाळी असल्याने तिच्यासाठी हा सण आयुष्यातील अविस्मरणीय ठरणार यात शंका नाही.
हे पण वाचा.. दिवाळीत ‘मंजुलिका’ आणि ‘सूतळी बॉम्ब’चा धमाल अवतार; कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे ची हटके दिवाळी शुभेच्छा









