shashank ketkar mandar devasthali payment controversy : मराठी मनोरंजनसृष्टीत पुन्हा एकदा कलाकारांच्या मानधनाचा मुद्दा चर्चेत आला आहे. अभिनेता #Shashank Ketkar यांनी सोशल मीडियावर केलेल्या स्फोटक पोस्टमुळे हा विषय ऐरणीवर आला असून त्यांनी ‘हे मन बावरे’ या मालिकेच्या निर्मात्यांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. पाच वर्षांपूर्वीच्या कामाचे पैसे आजतागायत न मिळाल्याचा दावा करत शशांकने आपला संताप उघडपणे व्यक्त केला आहे.
४ जानेवारी २०२६ रोजी शशांक केतकरने एक पोस्ट शेअर करत निर्मात्यांनी तब्बल पाच वर्षांनंतरही पूर्ण पेमेंट न दिल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी ५ जानेवारी ही एक अंतिम तारीख देण्यात आली असून, त्या दिवशीही पैसे मिळाले नाहीत तर सगळं पुराव्यासह उघड करणार असल्याचा इशाराही त्याने दिला होता. मात्र ठरलेल्या तारखेपर्यंतही प्रश्न सुटला नसल्याने शशांकने आता आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.
या नव्या पोस्टमध्ये शशांकने स्पष्टपणे सांगितलं आहे की, तो कायदेशीर कारवाई करतच आहे. त्यासोबतच त्याने दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर थापा मारण्याचा ठराविक पॅटर्न असल्याचा आरोप केला आहे. हे दाखवण्यासाठी त्याने काही व्हिडीओ कॉल्स आणि संवादांचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहेत. पैसे मागितले की समोरचा भावनिक होतो, गयावया करतो आणि कलाकारांना गोंधळात टाकतो, असं शशांकने लिहिलं आहे.
शशांकच्या मते, पाच लाख रुपयांची रक्कम एखाद्यासाठी मोठी नसेल, पण त्याच्यासाठी ती महत्त्वाची आहे. त्याने मालिकेचे ठरलेले मूळ पैसे कसाबसा मिळवले, मात्र पगारातून कापलेला टीडीएस आजही भरलेला नाही, असा आरोप त्याने केला आहे. म्हणजेच कलाकाराकडून टीडीएस कापून तो सरकारकडे जमा न करणं हा दुहेरी गुन्हा असल्याचं त्याने नमूद केलं आहे.
ही समस्या फक्त स्वतःपुरती मर्यादित नसून अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ याच परिस्थितीला सामोरे जात असल्याचं शशांकने सांगितलं. काही जणांचे तर मूळ पैसे आणि टीडीएस दोन्ही बाकी असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. मात्र सध्या आपण स्वतःच्या प्रकरणाबाबतच बोलत असल्याचं त्याने लिहिलं आहे.
या प्रकरणात सगळेच निर्माते असे नसतात, याची जाणीव करून देत शशांकने हे आरोप फक्त मंदार देवस्थळी यांच्यापुरते मर्यादित असल्याचं सांगितलं आहे. इंडस्ट्रीत अनेक प्रामाणिक आणि व्यावसायिक निर्माते असल्याचंही त्याने नमूद केलं. ‘आम्ही मन लावून काम करतो, त्यामुळे वेळेत पैसे मिळणं ही किमान अपेक्षा आहे,’ असं स्पष्ट मत Shashank Ketkar यांनी व्यक्त केलं आहे.
हे पण वाचा.. स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेला पडदा, मंदर जाधवांची भावनिक पोस्ट चर्चेत
दरम्यान, ‘सुखाच्या सरींनी मन हे बावरे’ ही मालिका २०१८ ते २०२० या काळात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता या मालिकेच्या पडद्यामागील आर्थिक वादामुळे संपूर्ण मराठी इंडस्ट्रीत पुन्हा एकदा कलाकारांच्या हक्कांवर चर्चा सुरू झाली आहे.
हे पण वाचा.. लग्नासाठी तयार होतेय’ – आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णीच्या उत्तराने चर्चेला उधाण









