sharmila shinde receives state award : मराठी टेलिव्हिजन आणि नाट्यक्षेत्रातील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री शर्मिला शिंदे हिला नुकताच राज्य शासनाचा नाट्य पुरस्कार जाहीर झाला असून, या सन्मानामुळे संपूर्ण कलाविश्वात आनंदाची लहर उसळली आहे. ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातील प्रभावी भूमिकेसाठी तिला हा बहुमान मिळाला आहे.
शर्मिला शिंदे गेली अनेक वर्षं मराठी रंगभूमी आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. विविधांगी भूमिका, प्रभावी सादरीकरण आणि सहजसुंदर अभिनय यामुळे तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. राज्य शासनाने तिच्या मेहनतीची दखल घेत हा सन्मान दिल्याने ती स्वतः भावूक झाली आहे.
अभिनेत्रीने पुरस्कार स्वीकारतानाचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. त्यामध्ये तिने आपल्या भावना उलगडत लिहिलं – “महाराष्ट्र शासनाने ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातील माझ्या भूमिकेसाठी माझ्या गळ्यात रौप्य पदक घालून माझं वजन वाढवलं आहे. खरं सांगायचं तर, मी कधीच पुरस्कारांसाठी काम केलेलं नाही आणि यापुढेही करणार नाही. पण हे मान्य करते की शासकीय पुरस्कार मिळणं ही प्रत्येक कलाकारासाठी आयुष्यभर लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट असते.”
याचबरोबर अभिनेत्री शर्मिला शिंदेने तिच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. ‘सफरचंद’ या नाटकाच्या काळात तिचा मित्र आमिर तडवळकर तिला राज्य नाट्य पुरस्कार मिळेल असा विश्वास व्यक्त करायचा, मात्र त्या वेळी तिला हा पुरस्कार मिळाला नाही. तथापि, यावर्षी कोणतीही अपेक्षा नसतानाही हा सुवर्णक्षण तिच्या आयुष्यात आला.
हे पण वाचा.. अभिनेत्री रसिका वखारकर चा साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्याचं नाव आलं समोर
पुरस्कार स्वीकृतीनंतर तिने आपल्या संपूर्ण टीमचे आभार मानले. “या प्रवासात माझ्या सहकलाकार आणि तांत्रिक टीमचं पाठबळ महत्त्वाचं ठरलं. हा पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी अधिक वाढली आहे आणि मी ती पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन,” अशा शब्दांत तिने कृतज्ञता व्यक्त केली.
राज्य शासनाचा हा पुरस्कार अभिनेत्री शर्मिला शिंदेच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. तिच्या चाहत्यांपासून सहकलाकारांपर्यंत सर्वांनीच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला असून, या सन्मानामुळे ती आणखी जोमाने कलाक्षेत्रात काम करत राहील अशी अपेक्षा आहे.
हे पण वाचा.. “आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; पारू फेम मुग्धा कर्णिकचा सल्ला”









