sakha maza pandurang serial karad gramstha mumbai set : ‘सन मराठी’वरील Sakha Maza Pandurang Serial ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. संत सखुबाई यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ही कथा छोट्या पडद्यावर सुंदर पद्धतीने उलगडत असून, महाराष्ट्रभरातील भक्तमंडळी मालिकेला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
कराड हे संत सखुबाईंचं जन्मस्थान असल्याने तेथील ग्रामस्थ या मालिकेशी आपुलकीनं जोडले गेले आहेत. विठ्ठलाच्या निस्सीम भक्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखुबाईंचं नाव संतपरंपरेत अत्यंत आदराने घेतलं जातं. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात संत सखुबाईंचं एकमेव मंदिर कराडमध्ये असल्यामुळे स्थानिकांसाठी या मालिकेला एक वेगळं महत्त्व आहे.
या मालिकेत सखुबाईंच्या बालपणीची भूमिका साकारत असलेली बालकलाकार स्वराली खोमणे प्रेक्षकांची लाडकी ठरत आहे. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. तिच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी कराडमधील संत सखुबाई मंदिर तसेच विठ्ठलदेव व त्र्यंबक देव ट्रस्टचे प्रमुख सदस्य—संजिव सराटे, शार्दुल चरेगावकर आणि सुरेंद्र काळे—थेट मुंबईत मालिकेच्या सेटवर पोहोचले.
योगायोग असा की, ज्या दिवशी हे मान्यवर स्वरालीला भेटायला आले, त्याच दिवशी तिचा वाढदिवस होता. त्यामुळे सेटवर केक कापून जल्लोषमय वातावरणात सेलिब्रेशन करण्यात आलं. या खास प्रसंगी उपस्थितांनी स्वरालीला आशीर्वाद देत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामस्थांच्या या भेटीमुळे मालिकेच्या टीमलाही मोठा उत्साह मिळाला. या वेळी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना उल्लेखनीय होत्या. त्यांनी सांगितलं, “संत सखुबाई या प्रत्यक्ष विठ्ठलाच्या सहवासात राहिलेल्या संत आहेत. त्यांच्यावर आधारित मालिका आजच्या काळात येणं फार गरजेचं होतं. ‘Sakha Maza Pandurang Serial’ मुळे हा प्रेरणादायी प्रवास जनसामान्यांपर्यंत पोहोचतोय, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
हे पण वाचा.. लपंडाव मालिकेत चेतन वडनेरे आणि रुपाली भोसलेच्या भूमिकां विशेष चर्चेत
या मालिकेत दिसणारा भावस्पर्शी प्रवास घराघरात पोहोचावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा असून, मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेतून तो संदेश प्रभावीपणे पोहोचवतो आहे.
‘सखा माझा पांडुरंग’ ही मालिका दररोज सायंकाळी ७.३० वाजता ‘सन मराठी’वर प्रसारित होत असून, प्रेक्षक या अध्यात्मिक आणि प्रेरणादायी प्रवासाचा अनुभव मोठ्या उत्सुकतेने घेत आहेत.
हे पण वाचा.. अमृता धोंगडे आणि सोनाली पाटीलचा ‘ठुमक ठुमक…’ या गाण्यावरील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल









