Sachin Kumawat Enters Bigg Boss Marathi 6 : कलर्स मराठी वाहिनीवर ११ जानेवारीपासून सुरू झालेल्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यंदा हा लोकप्रिय रिॲलिटी शो अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत असून, पुढील तब्बल १०० दिवस विविध क्षेत्रांतील ओळखीची आणि चर्चेतली व्यक्तिमत्त्वं बिग बॉसच्या घरात एकत्र राहणार आहेत. कलाकार, कॉमेडियन, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ते राजकीय पार्श्वभूमी असलेले चेहरे या पर्वात दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
‘दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!’ या घोषवाक्यासह सुरू झालेल्या बिग बॉस मराठी 6 मध्ये पहिल्याच दिवशी अनेक स्पर्धकांनी घरात प्रवेश केला. दीपाली सय्यद, सागर कारंडे, सोनाली राऊत, राकेश बापट यांसारख्या ओळखीच्या चेहऱ्यांसह एक नाव विशेष लक्ष वेधून घेणारं ठरलं, ते म्हणजे जळगाव जिल्ह्यातील खान्देशचा सुपुत्र Sachin Kumawat. घरात तिसऱ्या क्रमांकाने एन्ट्री करताच सचिनने आपल्या साध्या स्वभावामुळे आणि वेगळ्या संवादशैलीमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
Sachin Kumawat याने घरात प्रवेश करताना अहिराणी भाषेत संवाद साधत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. खान्देशी मातीचा सुगंध असलेली त्याची भाषा, सहज बोलणं आणि मोकळेपणा पाहून घरातील सदस्यांसह प्रेक्षकही भारावून गेले. सामान्य कुटुंबातून आलेला सचिन इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा स्टार बनला. युट्युबवर त्याचे दोन कोटींहून अधिक सबस्क्राइबर्स असून, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही त्याला लाखोंनी फॉलोअर्स आहेत.
Sachin Kumawat याने तयार केलेले अहिराणी भाषेतील व्हिडिओ केवळ खान्देशातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरले आहेत. विशेषतः ‘बबल्या केसावर एकस फुगे’ या अहिराणी गाण्याच्या व्हिडिओने तब्बल २९ कोटी व्ह्यूजचा टप्पा गाठत विक्रम केला आहे. त्याच्या या लोकप्रियतेमुळे बिग बॉस मराठीचं व्यासपीठ ही त्याच्यासाठी मोठी संधी मानली जात आहे.
हे पण वाचा.. रसिका वखारकरचा लग्न काउंटडाऊन सुरू; ‘10 Days To Go’ व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता
खान्देशी संस्कृती, ग्रामीण जीवनशैली आणि स्थानिक बोलीभाषेचं प्रतिनिधित्व Sachin Kumawat बिग बॉसच्या घरातून करताना दिसत आहे. त्यामुळे जळगावसह संपूर्ण खान्देशातील प्रेक्षकांमध्ये अभिमान आणि उत्साहाचं वातावरण आहे. पुढील १०० दिवसांच्या या प्रवासात सचिन किती पुढे जातो, कोणती छाप पाडतो आणि बिग बॉसच्या खेळात कशी रणनीती आखतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
हे पण वाचा.. बिग बॉस मराठी ६ मध्ये तन्वी कोलतेची धडक एन्ट्री, ‘लक्ष्मी निवास’ची कूल सून थेट बिग बॉसच्या घरात









