ADVERTISEMENT

तेजश्री प्रधान सोबत पहिल्याच सीनमध्ये आलेलं दडपण; राज मोरेचा ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मधील अनुभव खास

अभिनेता राज मोरेने ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत तेजश्री प्रधानसोबत काम करताना आलेला अनुभव सांगितला आहे. पहिल्याच सीनदरम्यान आलेल्या दडपणापासून ते ऑनस्क्रीन नात्याच्या फुलण्यापर्यंतचा प्रवास त्याने उलगडला.
वीण दोघांतली ही तुटेना

झी मराठीवरील नव्या मालिकांपैकी ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही सध्या प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. समर आणि स्वानंदी यांच्या नात्याभोवती फिरणारी ही कथा केवळ प्रेमकथेत मर्यादित न राहता कुटुंब, भावंडांचे नाते आणि संघर्ष यांचा सुंदर संगम दाखवते. मालिकेत तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आणि सुबोध भावे प्रमुख भूमिकेत असून, त्यांच्यासोबत अनेक कलाकार महत्वाच्या भूमिका साकारत आहेत. यामध्ये राज मोरेची भूमिकाही लक्षवेधी ठरत आहे.

राज मोरे यापूर्वी ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रेक्षकांसमोर आले होते. त्या मालिकेत त्याने एजेचा मुलगा आणि सरूचा नवरा विराज ही भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली होती. पण ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये तो एका पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसतो आहे. मालिकेत तो रोहन सरपोतदारची भूमिका करत असून, स्वानंदीचा भाऊ म्हणून त्याची भूमिका कथानकाला वेगळा रंग देत आहे.

रोहन हा शांत, मेहनती आणि स्वतःचं करिअर घडवण्याचं स्वप्न पाहणारा तरुण आहे. त्याला आपल्या बहिणीचं लग्न योग्य ठिकाणी व्हावं, यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची धडपड आहे. विशेष म्हणजे, रोहनला आपल्या बहिणीच्या होणाऱ्या दीर समरकडून (सुबोध भावे) मान्यता मिळवायची आहे. त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीत स्वतःला प्रामाणिकपणे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो.

राज मोरेने या भूमिकेची निवड कशी झाली, याबद्दल सांगताना उलगडलं की, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका संपल्यानंतर तो विविध ऑडिशन्स देत होता. त्याच वेळी त्याला ‘वीण दोघांतली ही तुटेना’साठी कॉल आला. मॉकशूट आणि वाचन झाल्यानंतर त्याची निवड झाली. टीव्हीवर मालिकेचा प्रोमो पाहिल्यावर त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कारण शाळेपासून झी मराठी पाहणारा राज, त्याच चॅनेलवर स्वतःचा प्रोमो पाहतोय ही मोठी गोष्ट होती.

हे पण वाचा.. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेवर रिमेकचा ठपका? Tejashri Pradhan म्हणाली..

मालिकेच्या सेटवरील अनुभवांबद्दल बोलताना राजने विशेषतः तेजश्री प्रधानसोबतच्या पहिल्या सीनची आठवण सांगितली. “पहिल्याच दिवशी माझा आणि तेजश्रीताईचा सीन होता. त्यावेळी मला प्रचंड दडपण आलं होतं. मी तिलाही हे सांगितलं. त्यावर ती म्हणाली की, ‘मीसुद्धा जेव्हा सीनियर कलाकारांसोबत काम केलं होतं, तेव्हा असंच दडपण आलं होतं. हे साहजिक आहे.’ तिच्या शब्दांनी मला दिलासा मिळाला आणि कामात सहजता आली.”

राजच्या मते, तेजश्री प्रधानने त्याला खूप कम्फर्टेबल केलं. पहिल्या सीननंतर त्यांचं ऑनस्क्रीन भावंडाचं नातं हळूहळू वास्तवातही जुळू लागलं. आज सेटवर त्यांचं मोकळं वातावरण आणि एकमेकांना दिलेला सहकार्यभाव हेच प्रेक्षकांना मालिकेत दिसतं.

राजने इतर सहकलाकारांविषयीही बोलताना सांगितलं की, किशोर महाबोले, जे मालिकेत त्याच्या वडिलांची भूमिका करत आहेत, त्यांच्याशी चांगली मैत्री झाली आहे. तसेच सुलभा आर्या मॅडमकडून शूटिंगदरम्यान शाहरुख खानविषयी किस्से ऐकण्याची त्याने पहिल्याच दिवशी मागणी केली होती.

हे पण वाचा.. ‘Tu Hi Re Majha Mitva’च्या अभिनेत्रींचा ‘आम्ही कांचो’ गाण्यावर धमाल डान्स; चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद

सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या केमिस्ट्रीसोबतच इतर कलाकारांचे दमदार अभिनय, भावनिक प्रसंग आणि हलके-फुलके क्षण मालिकेला वेगळेपण देतात. राज मोरेच्या भूमिकेने मालिकेतला भावंडांचा स्नेह अधिकच गहिरा केला आहे, आणि प्रेक्षकांनाही त्याचा हा नवा अवतार आवडत आहे.