purniemaa dey natural diet secrets : मराठी मनोरंजन जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री Purniemaa Dey केवळ अभिनयातच नव्हे, तर फिटनेसच्या बाबतीतही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी पूर्णिमा डे प्रत्यक्षात डाएटिशन आहे. त्यामुळे योग्य आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीबद्दल तिची दृष्टी अधिक स्पष्ट आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या रोजच्या आहाराबद्दल आणि त्यामागील विचारांविषयी सांगितलं.
ती म्हणते की तिला घरचं, साधं आणि ताजं बनलेलं जेवणच जास्त पसंत. महाराष्ट्रीयन पदार्थांची तिला विशेष आवड असून, शक्य तिथे ती स्वतः स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते. मात्र शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे यामध्ये सातत्य ठेवणं तिला नेहमी शक्य होत नाही. तरीही शरीराचं ऐकत, त्याला जुळणारं अन्न खाणं महत्त्वाचं असल्याचं ती ठामपणे सांगते.
Purniemaa Dey तिच्या दिवसाची सुरुवात हलक्या नाश्त्याने करते. कधी अंडी, तर कधी स्मुदी किंवा फळं — तिच्या म्हणण्यानुसार नाश्त्यात भारी पदार्थ असणं तिला आवश्यक वाटत नाही. मात्र दुपारचं जेवण ती कधीही चुकवत नाही. पोळीऐवजी भाकरी तिला जास्त रुचते आणि भाजी, कोशिंबीर व दह्याशिवाय तिचं जेवण पूर्णच होत नाही. दही आणि ताकासारख्या पदार्थांचं नियमित सेवन केल्यास पचन सुधारतं आणि शरीराला आवश्यक ओलावा मिळतो, असं ती सांगते.
संध्याकाळी साधारण चारच्या सुमारास तिला थोडं तिखट किंवा खमंग काहीतरी खायला आवडतं, मात्र ते पौष्टिक असणं तिला आवश्यक वाटतं. रात्रीच्या जेवणाबाबत ती खूप ठाम आहे—जेवण पचायला दोन-तीन तास लागत असल्याने रात्री सातच्या आत खाणं तिने सवय केली आहे. उशिरा भूक लागली तर ती फक्त सूपसारख्या हलक्या गोष्टींचाच पर्याय निवडते.
ती सांगते की बालपणी तिला बाहेरचं चटर पटर खायला परवानगी नव्हती. कॉलेजमध्ये गेल्यानंतरच तिने पहिल्यांदा असे पदार्थ चाखले. तरीही आज तिने स्वतःसाठी स्वच्छ, घरगुती आणि साध्या अन्नाचीच दिशा ठरवली आहे.
फिटनेसबद्दलचा तिचा मंत्रही तितकाच सोपा—“शरीर जसं आहे तसं स्वीकारा, त्याच्यावर प्रेम करा. स्वच्छ अन्न खा, पाणी भरपूर प्या, संध्याकाळी सातपूर्वी खा आणि थोडा व्यायाम दररोज करा. जेवल्यानंतर थोडं चाललात तरी फरक जाणवतो.” तिच्या म्हणण्याप्रमाणे शरीराला अनुकूल असा आहार आणि नियमित हालचाल यामुळे ऊर्जा टिकून राहते आणि मनही प्रसन्न राहते.
हे पण वाचा.. प्राजक्ता गायकवाडच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल; लग्नाची तयारी सुरू
Purniemaa Dey ने सांगितलेला हा सहज, घरगुती आणि सुलभ डाएट प्लॅन आजच्या धावपळीच्या जगात अनेकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.
हे पण वाचा.. Tharala Tar Mag : महिपतची २२ वर्षांनंतर कबुली! प्रतिमा-सायलीच्या जीवावर बेतलेलं संकट; मालिकेत धडकी भरवणारा ट्विस्ट









