मराठी अभिनेत्री Prarthana Behere हिच्यासाठी मागील काही महिने अत्यंत भावनिक आणि कठीण गेले. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी तिच्या वडिलांचं एका दुर्दैवी रस्ते अपघातात निधन झालं होतं. या घटनेनंतर प्रार्थनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी चाहत्यांना दिली होती. आता काही काळानंतर तिने पुन्हा एकदा आपल्या बाबांच्या आठवणींना उजाळा देत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान Prarthana Behere अनेक मुलाखती देत आहे. याच दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत तिने वडिलांच्या निधनानंतर शूटिंग पुन्हा सुरू करण्याचा अनुभव अतिशय प्रामाणिकपणे सांगितला. तिच्या मते, या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच तिच्या वडिलांचं निधन झालं. दोन दिवसांची सुट्टी असताना ते बडोद्याला गेले होते आणि तिथे झालेल्या अपघाताची बातमी तिला मिळाली.
त्या क्षणाबद्दल बोलताना प्रार्थना सांगते की, तिने तात्काळ दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी कोणतीही अडचण न आणता तिला आधी स्वतःला सावरायला सांगितलं. “तू कधी तयार असशील तेव्हाच शूटिंग सुरू करू,” हे शब्द तिला मोठा भावनिक आधार देणारे ठरले. निर्मात्यांनीही तिच्यावर कोणताही दबाव न आणता पूर्ण समजून घेतलं, असं ती आवर्जून नमूद करते.
Prarthana Behere पुढे सांगते की, वडिलांच्या जाण्यानंतर तिच्या मनात अनेक प्रश्न होते. सिनेमाचं शूटिंग, आर्थिक गुंतवणूक, इतर कलाकारांच्या तारखा—या सगळ्याचा विचार तिच्या डोक्यात चालू होता. मात्र संपूर्ण टीमने तिच्या दुःखाला प्राधान्य दिलं, यामुळे ती हळूहळू सावरू शकली. जवळपास १३ दिवसांनी ती पुन्हा सेटवर परतली, मात्र त्या वातावरणाशी जुळवून घेणं तिच्यासाठी सोपं नव्हतं.
ती सांगते की, शूटिंगदरम्यान अनेकदा ती भावूक व्हायची, रडायची; पण त्या काळात केदार शिंदे, निर्मिती सावंत आणि संपूर्ण टीम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. त्यामुळेच हा सिनेमा तिच्यासाठी केवळ एक प्रोजेक्ट न राहता वडिलांना दिलेली एक भावनिक श्रद्धांजली ठरला आहे.
हे पण वाचा.. पिंगा गं पोरी पिंगा’मधील मिठू म्हणजेच प्राजक्ता परबने मालिका सोडली; भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली..
‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या सिनेमात सासू-सुनेच्या नात्याचं हलकंफुलकं, पण आशयपूर्ण चित्रण आहे. Prarthana Behere आणि निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे. मात्र आता या सिनेमामागची भावनिक कथा समोर आल्यानंतर प्रेक्षकांचा या चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिकच बदलणार, हे निश्चित.
हे पण वाचा.. ठरलं तर मग मध्ये लवकरच मोठा खुलासा! जुई गडकरीच्या पोस्टमुळे वाढली उत्सुकता







