prajakta gaikwad shambhuraj khutwad wedding ceremony : मराठी मालिकांच्या जगतातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने आज (२ डिसेंबर) दुपारी १२.२४ वाजता शुभमुहूर्तावर शंभुराज खुटवडसोबत विवाहबंधनात अडकत आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठला. तिच्या या राजेशाही विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरशः तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लग्नासाठी प्राजक्ताने पारंपरिक मराठी पोशाखाची निवड केली होती. हिरव्या रंगाच्या नऊवारी साडीसोबत नथ, हिरव्या बांगड्या आणि मॅचिंग शाल असा तिचा लूक उठून दिसत होता. तिच्या या सोज्वळ रूपाने कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांचे तसेच ऑनलाईन चाहत्यांचेही लक्ष वेधले. तर वरपक्षातील शंभुराज खुटवड यांचा राजेशाही पोशाखही तितकाच आकर्षक ठरला. नवरा–नवरीच्या या जोडीचा रॉयल अंदाज आता सर्वत्र चर्चेत आहे.
परंपरेनुसार नवऱ्याचा कान पिळण्याचा समारंभही हसत-खेळत रंगला. प्राजक्ताच्या भावाने शंभुराज दाजींचा कान पिळतानाचे क्षण पाहून उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला. या क्षणी प्राजक्ता गायकवाड हिचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. दुसरीकडे, कन्यादानावेळी तिची आई भावूक होतानाचे दृश्य अनेकांच्या डोळ्यात पाणी आणून गेले.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात दोघांचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर प्राजक्ताने लग्नपत्रिका सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना या नव्या प्रवासाची झलक दिली होती. हळद, मेहंदी, संगीत, घाणा असे सर्व विधी पारंपरिक पद्धतीने पार पडले आणि आज या दोघांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.
लग्नानंतर प्राजक्ता गायकवाड आता अधिकृतपणे खुटवड घरची सून झाली आहे. मजेशीर बाब म्हणजे प्राजक्ता आणि शंभुराज यांची पहिली भेटही एका अनपेक्षित प्रसंगातून झाली—प्राजक्ताच्या गाडीला एका ट्रकने दिलेल्या धडकेनंतर दोघांची ओळख झाली आणि तिथून पुढे मैत्री, नाते आणि आता आयुष्यभराची साथ अशी प्रवासकथा रंगली.
हे पण वाचा.. लोणावळ्यात धामधूमीत पार पडला सोहम–पूजाचा राजेशाही सोहळा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
या नवदांपत्यावर संपूर्ण मराठी कलाविश्वातून प्रेमाचा वर्षाव होत असून त्यांच्या नव्या आयुष्याला सदिच्छा दिल्या जात आहेत.
हे पण वाचा.. रुचिरा जाधव चा समुद्रकिनारी बोल्ड अंदाज; लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक चर्चेत









