New twist in the Tarini serial : झी मराठीवरील Tarini ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. तारिणीचा निर्भीड स्वभाव, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची तिची ताकद, केदारची तिला मिळणारी खंबीर साथ आणि कुटुंबातील गुंतागुंतीची नाती यामुळे ही मालिका सातत्याने चर्चेत राहते. प्रत्येक भागात येणारे नवे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि आता समोर आलेल्या प्रोमोमुळे तर उत्सुकता अधिकच वाढली आहे.
मालिकेच्या सध्याच्या कथानकात केदार हा दयानंद खांडेकरांचा मुलगा असल्याचं सत्य उघड झालं आहे. या खुलाशानंतर कौशिकीने दयानंद खांडेकरांना केदारला घरात परत आणण्याचं वचन दिलं होतं. त्यानुसार ती केदारशी बोलायला जाते. दुसरीकडे, तारिणीला एका महत्त्वाच्या केसमधील माहिती फक्त खांडेकरांच्या घरातूनच मिळू शकते, असं समजतं. या परिस्थितीत तारिणी आणि केदार एक धाडसी निर्णय घेतात. दोघेही पती-पत्नी असल्याचं नाटक करत खांडेकर कुटुंबात प्रवेश करण्याचं ठरवतात.
जेव्हा केदार तारिणीला घेऊन खांडेकरांच्या घरी येतो आणि लग्न झाल्याचं जाहीर करतो, तेव्हा घरात एकच खळबळ उडते. तारिणीवर संधीसाधूपणाचे आरोप होतात. श्रीमंत घरात सून होण्यासाठी तिने हे लग्न केल्याचं बोललं जातं. या सगळ्या आरोपांमध्ये तारिणीची मानसिक अवस्था अधिकच बिघडते.
समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये परिस्थिती आणखी तणावपूर्ण होताना दिसते. तारिणीची सावत्र आई आणि आत्या खांडेकरांच्या घरी येऊन तिला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. सावत्र आईचा हात उचलला जातो, तेव्हा केदार ठामपणे उभा राहून तारिणीची बाजू घेतो. “ती माझी बायको आहे,” असं स्पष्ट सांगत तो कोणत्याही अन्यायाला विरोध करतो. मात्र आत्या तारिणीला फरफटत बाहेर नेण्याचा प्रयत्न करते, तेव्हा कौशिकी मध्ये पडते.
या सगळ्या गोंधळात सर्वांत भावूक क्षण येतो, तो म्हणजे तारिणीची आजी तिथे येते तेव्हा. “जिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला, तिनं माझ्यापासून सगळ्यात मोठी गोष्ट लपवली,” असे शब्द आजीच्या तोंडून निघतात. हे ऐकून तारिणी कोलमडून पडते. आजीकडे धाव घेण्याचा प्रयत्न करते; पण आजी तिला जवळ येऊ देत नाही. हा क्षण पाहून प्रेक्षकही हळवे होतात.
हे पण वाचा.. लोक शिव्या द्यायचे, तेव्हा त्रास व्हायचा… पण तेच प्रेम होतं – मिलिंद गवळी यांची नकारात्मक भूमिकांवर स्पष्ट भूमिका
झी मराठीने हा प्रोमो शेअर करताना, तारिणीच्या एका निर्णयामुळे नवी नाती जोडताना जुनी नाती दुरावतील का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. Tarini मालिकेत पुढे काय घडणार, तारिणी आणि आजीमधील नातं पुन्हा सावरलं जाणार का, हे पाहणं प्रेक्षकांसाठी निश्चितच उत्कंठावर्धक ठरणार आहे.
हे पण वाचा.. अहिराणी ठेक्यावर थिरकली दिशा परदेशी; ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल









