Meghan Jadhav Anushka Pimputkar kelvan celebration : लोकप्रिय मालिकेतील प्रेमळ आणि संस्कारी जयंत म्हणजेच मेघन जाधव याच्या घरात सध्या लगीनघाईचं वातावरण रंगतंय. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीची ओळख सर्वांना करून देत मेघनने प्रेमाची कबुली दिली आणि आता त्याचं व अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर यांचं लग्न जवळ आलं आहे. या गोड प्रवासाची पहिली औपचारिकता म्हणजेच केळवण नुकतंच धुमधडाक्यात पार पडले.
विशेष म्हणजे हा सोहळा फक्त कुटुंबापुरता मर्यादित न राहता ‘लक्ष्मी निवास’च्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत रंगला. पारंपरिक वातावरणाने सजलेल्या एका खास रेस्टॉरंटमध्ये हा समारंभ झाला. फुलांची सजावट, गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेली जेवणावळीची थाळी, केळीच्या पानावर “मेघन–अनुष्का केळवण” अशी केलेली सुंदर अक्षरांची नक्षी – या सगळ्यांमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली.
मालिकेतील सहकलाकारांनी मेघन व अनुष्काचं औक्षण करून स्वागत केलं आणि त्यानंतर दोघांनीही पाहुण्यांचे प्रेमाने अभिवादन केलं. यावेळी मेघनने अनुष्काला पहिला घास भरवताना अगदी हटके आणि भावूक करणारा बॉलीवूड स्टाइल उखाणा घेतला. “अनुष्का तुझं नाव घेतो… तूच माझी मस्तानी, तूच माझी काशी,” असं म्हणताच वातावरणात चिअर्स आणि टाळ्यांचा गजर झाला. अनुष्कानेही आश्चर्याने “ओ माय गॉड” अशी गोड प्रतिक्रिया देत उपस्थितांचे मन जिंकले.
हर्षदा खानविलकर, अक्षया देवधर, कुणाल शुक्ल, दिव्या पुगावकर यांसारखी संपूर्ण टीम आपल्या परिवारांसह या खास क्षणाची साक्षीदार झाली. सर्वांनी मिळून मेघन–अनुष्कावर प्रेमाचा वर्षाव केला. शेवटी दोघांनी केक कापून हा आनंदाचा क्षण साजरा केला आणि हर्षदा खानविलकर यांनी नवदाम्पत्याला ‘लक्ष्मी निवास’च्या टीमतर्फे खास भेट देत शुभेच्छा दिल्या.
हे पण वाचा.. लक्ष्मी निवासच्या सेटवर सर्वात जास्त मस्ती कोण करते? हर्षदा खानविलकर यांनी घेतलं खास नाव
सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून चाहत्यांकडून “Meghan Jadhav & Anushka Pimputkar” जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ऑन-स्क्रीनसारखंच ऑफ-स्क्रीन बंधही इतकाच घट्ट असल्याचं पाहून प्रेक्षक भारावले आहेत.
हे पण वाचा.. एका निर्णयानं पालटली आयुष्याची दिशा; ‘तारिणी’ फेम नियती राजवाडेचा भावनिक प्रवास









