malegaon incident surbhi bhave reaction : मालेगावमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेला अमानुष अत्याचार आणि त्यानंतर तिचा निर्घृण खून या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. डोंगराळे गावातील हा प्रकार उघड झाल्यापासून सर्वच स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारही या प्रकरणाबाबत भावनिक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यात अभिनेत्री सुरभी भावेचा (Surbhi Bhave) संतापजनक व्हिडीओ विशेष चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सुरभी भावेने घटनेबद्दल बोलताना आपला रोष स्पष्टपणे व्यक्त केला. ती म्हणाली की, दिवसभर या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची बातमीच मनात घर करून बसली आहे. मुलीच्या वडिलांबरोबर झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी एका नराधमाने एवढ्या लहान बाळाचं आयुष्य संपवलं, हे तिला अतिशय अस्वस्थ करणारं असल्याचं तिने सांगितलं. अशा कृत्यांसाठी काहींच्या विकृत विचारांना वेळीच रोखणं गरजेचं असल्याचं ती ठामपणे म्हणाली.
पुढे बोलताना सुरभी भावेने या अपराध्याला अतिशय कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. “अशा माणसाला जिवंत ठेवण्यात काही अर्थ नाही,” असे स्पष्ट शब्दांत ती म्हणाली. चिमुरडीला दिलेल्या यातना आठवल्या की मन हेलावून जात असल्याचाही उल्लेख तिने केला. तिच्या मते, अशा घटनांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत जलद गतीने चालून २४ ते ३६ तासांत निर्णय होणे आवश्यक आहे, जेणेकरून समाजात दहशत निर्माण होईल आणि भविष्यात कोणीही अशा गुन्ह्याचा विचारही करणार नाही.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही सुरभी भावेने पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली. “हिंस्त्र मानसिकता असलेल्यांना वेळीच आळा बसणं गरजेचं आहे,” असे ती म्हणाली. तिच्या पोस्टखाली जनतेने मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आरोपीवर त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, अभिनेत्री रुचिरा जाधव आणि प्रियांका केतकर यांनीदेखील या घटनेवर संताप व्यक्त करत सरकार आणि पोलिसांनी जलद कारवाई करावी, असे आवाहन केले आहे. मालेगावच्या या हृदयद्रावक घटनेमुळे पुन्हा एकदा बालसुरक्षेचा मुद्दा गंभीरपणे पुढे आला असून समाजातील असुरक्षित मानसिकतेचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे.
हे पण वाचा.. लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत नवा ट्विस्ट; नक्षत्रा मेढेकर साकारणार सुकन्या, कलाचा जीव वाचवण्यासाठी धावली









