Priyanka Ketkar Malegaon case नाशिकच्या मालेगाव तालुक्यात घडलेल्या निर्घृण घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिला आहे. गावातील फक्त साडेतीन वर्षांची चिमुरडी खेळण्यासाठी घराबाहेर पडली आणि परतच घरी आली नाही. संध्याकाळपर्यंत ती परत न आल्यानंतर गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरा गावालगतच्या मोबाईल टॉवरजवळील झुडपांत तिचा मृतदेह आढळला. अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आल्याचा भयानक संशय समोर येताच संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली.
या अमानवी घटनेवर सामान्यांपासून ते कलाविश्वातील अनेक कलाकारांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली आहे. यामध्ये मराठी अभिनेत्री आणि अभिनेता शशांक केतकरची पत्नी प्रियांका केतकर हिची प्रतिक्रिया विशेष चर्चेत आहे. सामाजिक प्रश्नांवर सरळ आणि स्पष्ट मत मांडणारी प्रियांका केतकरने या प्रकरणावरही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला तीव्र संताप व्यक्त केला.
तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, “ही घटना ऐकून मी पूर्णपणे हादरून गेले आहे. एवढ्या लहान निरागस मुलीवर इतकं विकृत अत्याचार? माणुसकी नेमकी कुठे हरवली आहे?” तिच्या या प्रश्नांनी अनेकांच्या भावना व्यक्त झाल्या. यापुढे बोलताना प्रियांका केतकरने वकिलाच्या भूमिकेतूनही संताप व्यक्त केला. “अशा गुन्हेगारांना स्वतःचा बचाव करण्याची आणि जामिनासाठी प्रयत्न करण्याची संधी मिळते, हीच खंत वाटते. न्यायव्यवस्था एवढी कमजोर का आहे? अशा राक्षसी कृत्य करणाऱ्यांना कडकात कडक शिक्षा झालीच पाहिजे,” असे ती म्हणाली. तिच्या या वक्तव्यांवर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद उमटत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर राज्य शासनाने तत्काळ दखल घेत खटला ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवण्याची तयारी दर्शवली आहे. आरोपीला न्यायालयाने २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून तपास वेगाने सुरू आहे. गावकरी, सामाजिक संघटना तसेच नेटिझन्स या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहेत.

मालेगावमधील या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने पुन्हा एकदा बालसुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे पुढे आला आहे. समाजातील प्रत्येक घटकातून संताप व्यक्त होत असताना, प्रियांका केतकरसारख्या कलाकारांनी पुढे येऊन आवाज उठवल्यामुळे या प्रकरणावर अधिक लक्ष वेधले जात आहे
सायलीसमोर उघडणार नवं रहस्य! प्रतिमा महिपत येणार आमने-सामने रंगणार ड्रामा








