मुलीसाठी आईचं रौद्र रूप… काजोलचा ‘Maa’ हा पौराणिक थरार भावनांनी भरलेला आहे.
Table of Contents
आईचं रूप कितीही प्रेमळ असलं, पण आपल्या लेकरासाठी ती कधी काळी कालीमातेचं रूप धारण करू शकते, हे आपण अनेकदा ऐकलंय. अगदी याच संकल्पनेवर आधारलेला ‘Maa’ हा नवा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून काजोलनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की, संकटाच्या क्षणी एक आई कुठल्या थरापर्यंत जाऊ शकते. ‘Maa Review’ पाहता, हा केवळ भयपट नाही, तर आई-मुलीच्या नात्याचा भावनिक संघर्ष मांडणारी ही कथा आहे.
पौराणिक घटकांची थरारक मांडणी
‘Maa’ हा चित्रपट एका थरारक कथा-विस्तारासह प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी भयपट, पौराणिकता आणि भावनिक गुंतवणूक यांचं सुरेख मिश्रण करत एक हटके सिनेमॅटिक अनुभव दिला आहे. ग्रामीण भागातल्या जुन्या रूढी, अंधश्रद्धा आणि त्यावर बंड करणारी आई याची कहाणी हळूहळू उलगडते.
Maa चित्रपटाच काय आहे कथानक?
अंबिका ही मूळची चंद्रपूर गावातील. तिचा नवरा शुभंकर आणि मुलगी श्वेता यांच्यासोबत ती शहरात राहत असते. मात्र, गावात पूर्वापार चालत आलेली एक भीषण प्रथा आहे – घरात जन्मलेल्या मुलीचा बळी देण्याची. याच भीतीपोटी शुभंकर आपल्या मुलीचं अस्तित्व गुप्त ठेवतो. पण अचानक वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला गावी जावं लागतं आणि दुर्दैवाने त्याचंही निधन होतं.
यानंतर गावाचा सरपंच अंबिकाला शुभंकरच्या घरजागेच्या व्यवहारासाठी बोलावतो. मुलगी श्वेतासोबत अंबिका गावात परतते. मात्र, गावात पोहोचताच विचित्र, भयावह घटना घडू लागतात. त्या घटनांचं सत्य, त्यामागचं भयावह पौराणिक रहस्य, आणि त्या परिस्थितीत अंबिकानं घेतलेले निर्णय यावर संपूर्ण ‘Maa ’चा थरार उभा राहतो.
लेखन व दिग्दर्शनात ताजेपणा
विशाल फुरिया यांनी पौराणिक कथेला आधुनिक पार्श्वभूमी देत चित्रपटाची मांडणी केली आहे. काही ठिकाणी बंगाली भाषेचा लहेजा थोडा अनावश्यक वाटतो, पण तो संपूर्ण कथा-विस्तारावर परिणाम करत नाही. रक्तबीज या पौराणिक राक्षसाच्या गोष्टीचा संदर्भ चित्रपटात हुशारीने गुंफण्यात आला आहे. व्हीएफएक्स विभागात थोडी अधिक मेहनत घेतली असती तर दृश्यं आणखी प्रभावी झाली असती. मात्र, सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीत प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणतात.
अभिनयाची बाजू ठाम
Maa चित्रपटामध्ये सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे काजोलचा अभिनय. अंबिकाच्या भूमिकेत तिनं एका आईची तडफड, काळजी आणि लढण्याची जिद्द अप्रतिम साकारली आहे. एकटीने चित्रपटाचा भार पेलत तिनं प्रेक्षकांना बांधून ठेवलं आहे. रोनित रॉय याची नकारात्मक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात धसका निर्माण करते. इंद्रनील सेनगुप्ताचा अभिनय ठीकठाक असला तरी त्याचं काजोलसोबतचं कनेक्शन फारसं भिडत नाही. मात्र, श्वेताच्या भूमिकेत खेरीन शर्मानं लहान वयातही जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे.
सकारात्मक आणि नकारात्मक बाजू
‘Maa Review’ करताना लक्षात येतं की चित्रपटाच्या पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनात स्पष्टपणा आहे. गीत-संगीतही कथेला पूरक वाटतं. मात्र, क्लायमॅक्समधली काही दृश्यं अतिरेक वाटतात आणि व्हीएफएक्स विभागाची मर्यादा जाणवते.
‘Maa’ हा चित्रपट आई-मुलीच्या नात्याच्या आधारावर उभा आहे, पण तो केवळ भावनिक नाही, तर पौराणिक थरार आणि अंधश्रद्धेविरोधातील बंडखोरीही त्यात दिसते. एक आई आपल्या मुलीला वाचवण्यासाठी कशी कालीमातेचं रूप धारण करते, हे पाहताना प्रेक्षक भारावून जातात.
जर तुम्हाला पौराणिक भयपटांचा अनुभव घ्यायचा असेल, तर ‘Maa’ एकदा तरी थिएटरमध्ये पाहावा असाच आहे. काजोलच्या अभिनयात दडलेली आईची तडफड, थरारक घटनाक्रम आणि दिग्दर्शनातली सफाई यामुळे हा चित्रपट लक्षात राहतो.
हे पण वाचा ..Photos: khushi kapoor चा क्लासी गोल्डन लूक; रेखा यांच्या ‘उमराव जान’ स्क्रिनिंगला दिली हजेरी