lagnanantar hoilach prem new promo big twist : लग्नानंतर होईलच प्रेम (Lagnanantar Hoilach Prem) ही स्टार प्रवाहवरील मालिका सध्या प्रेक्षकांना एका मागोमाग एक ट्विस्ट देत असून, नवीन प्रोमोमुळे तर उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काव्या आणि जीवाच्या भूतकाळाबाबत उलगडणारे धागेदोरे या मालिकेत आधीच दाखवले गेले होते. मात्र, आता नेमका कोणता सत्याचा क्षण पात्रांच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार, यावर प्रेक्षकांचे लक्ष खिळले आहे.
मालिकेत काही दिवसांपूर्वी उघड झाले होते की, लग्नापूर्वी काव्या एका नात्यात होती. तिची सासू मालिनीला हे कळले असले तरी त्या व्यक्तीचे नाव तिला ठाऊक नव्हते. हे रहस्य म्हणजेच मालिनीच्याच धाकट्या मुलगा जीवाचे नाव. जीवनं आणि काव्याचं पूर्वी रिलेशनशिप असतानाच परिस्थितीने अशी कलाटणी घेतली की सर्वांचीच जुळवाजुळव बिघडली. जीवाचं लग्न काव्याच्या बहिणीशी आणि काव्याचं लग्न जीवाच्या मोठ्या भावाशी, म्हणजे पार्थशी झालं.
लग्नं जरी परिस्थितीजन्य असली तरी वेळ जसजसा पुढे सरकला, तसतसे हे चौघेही आपापल्या नात्यांना स्वीकारू लागले. भूतकाळ मागे टाकून नव्या आयुष्याला सुरुवात करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसू लागला. या सगळ्यात खास गोष्ट म्हणजे पार्थ आणि नंदिनीला अजूनही काव्या-जीवाच्या पूर्वीच्या नात्याची कल्पना नाही.
नव्या प्रोमोमध्ये हे चौघे एकत्र पाणीपुरी खाताना दाखवले आहेत. खेळकर वातावरणात स्पर्धा रंगते आणि त्याचवेळी नंदिनीला फोन येऊन ती थोड्या वेळासाठी बाहेर जाते. तिच्या अनुपस्थितीत काव्याला अचानक ठसका लागतो. पार्थ काळजीने तिला वर पाहण्यास सांगतो, तर जीवा झटकन पाणी आणून तिच्या डोक्यावर टाकतो आणि काव्या शांत होते. तेव्हाच नंदिनी परत येते आणि आश्चर्याने विचारते—
“काव्याला असं केलं की बरी होते हे घरातल्यांना माहीत होतं… पण जीवा, तुला हे कसं माहीत?”
इतक्या अनपेक्षित प्रश्नानंतर जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहतात, आणि इथूनच प्रेक्षकांच्या मनात नवा प्रश्न आकार घेतो—नंदिनीला आता काव्या-जीवाच्या भूतकाळाची चाहूल लागणार का?
हे पण वाचा.. आग, भीती आणि शूटिंगचा थरार! “संजना काळे” ने दिले त्या सीनचे अनसुने तपशील
स्टार प्रवाहने हा प्रोमो शेअर करताना याच प्रश्नावर भर दिला असून, मालिकेच्या आगामी भागांमध्ये कोणती नवी नाट्यमय उकल होणार, हे पाहणे खरोखरच रंजक ठरणार आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील हा नवा ट्विस्ट पुढील घटनांना कोणता वेग देतो, याकडे लक्ष लागून आहे.
हे पण वाचा.. सहकुटुंब सहपरिवार ची अंजी विवाहबंधनात; अभिनेत्री कोमल कुंभार ने गोकुळसोबत सुरू केला नव्या जीवनाचा प्रवास









