lagnanantar hoilach prem navin twist : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवते आहे. प्रत्येक भागात दिसणारे नवे ट्विस्ट आणि पात्रांमधील नात्यांचे बदल यामुळे या मालिकेबद्दल चर्चेचा धडाका सुरू असतो. नुकताच प्रदर्शित झालेला प्रोमो पाहिल्यानंतर तर प्रेक्षक अधिकच उत्सुक झाले असून, सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
मालिकेतील मुख्य पात्र काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी आणि मानिनी यांच्या आयुष्यात दररोज नवे वळण येताना दिसते. काही दिवसांपूर्वीच मानिनीला कळले की काव्याचे लग्नाआधी कोणावर तरी प्रेम होते. ती माहिती तिला तिच्या मैत्रिणीकडून मिळाली. मात्र, तो मुलगा जीवा होता, हे अद्याप मानिनीच्या लक्षात आलेले नाही. काव्याने या प्रश्नाला थेट उत्तर देताना आता तिला कोणावरच प्रेम नाही, असे सांगितले होते. तरीसुद्धा काव्याचे पार्थबरोबरचे नाते जुळून आलेले नाही, असे मानिनीला वाटत असल्याने तिचा दृष्टिकोन अधिक कठोर झाला आहे.
नवीन प्रोमोमध्ये मानिनीचा असाच एक नकारात्मक पवित्रा दिसून येतो. काव्याने पार्थसाठी बनवलेला फ्रूट सॅलेड पार्थ आनंदाने मागतो, पण त्याचवेळी मानिनी मुद्दाम ते भांडे खाली फेकून देते. त्यानंतर काव्या डोळ्यांत पाणी आणून आपल्या मैत्रिणीला सांगते की आज पार्थच्या डोळ्यात अश्रू आले, त्यांना वेदना झाल्या, आणि मला काहीच जाणवणार नाही का? यावर तिची मैत्रीण तिला विचारते – “कोणत्या हक्काने?” त्यावर काव्या अनायासे म्हणते, “मी त्यांची बायको…” आणि वाक्य अपुरे सोडते. या संवादामुळे प्रेक्षकांना काव्याच्या मनातील खरी भावना झलकताना दिसते.
हा प्रोमो शेअर करताना वाहिनीने कॅप्शन दिले – “काव्याला होणार पार्थ आणि तिच्या नात्याची जाणीव.” त्यामुळे पुढील भागांमध्ये काव्याच्या मनातल्या भावनांची कबुली बाहेर येणार का, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींना हा ट्विस्ट आवडला असून त्यांनी “काव्याने पार्थला स्वीकारायला सुरुवात केली”, “छान प्रोमो आहे” अशा सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. मात्र, मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी मानिनीच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. “मानिनी काकू आता जरा अती करत आहेत”, “काव्या-पार्थ यांच्यात सकारात्मक काही दाखवा”, “संपूर्ण ट्रॅकच नकारात्मक केलाय” अशा कमेंट्सने सोशल मीडिया भरला आहे.
हे पण वाचा.. Muramba Serial : आरोहीच्या प्रयत्नाने रमा-अक्षय पुन्हा येणार का जवळ? दसऱ्याच्या प्रोमोने वाढवली उत्सुकता
आता मालिकेत पुढे काय घडते, मानिनीला जीवा हे सत्य समजते का, तसेच काव्या आणि पार्थच्या नात्यात खरी जवळीक निर्माण होते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ प्रेक्षकांना पुढील भागांमध्ये अजून कोणते धक्कादायक वळण दाखवते, हे लवकरच स्पष्ट होईल.









