kamali tarini grand crossover vijaya babar experience : झी मराठीवर नुकताच प्रदर्शित झालेला ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ मालिकांचा महासंगम एपिसोड प्रेक्षकांसाठी खास ठरला. दोन वेगवेगळ्या कथानकांच्या धाग्यांना एकत्र आणत या भागात रहस्य, नाट्य आणि जीवघेणा प्रसंग यांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला. महाविद्यालयात सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी तारिणी आणि केदार कमळीच्या कॉलेजमध्ये पोहोचतात, आणि याच ठिकाणी कथानकाला वेगळीच कलाटणी मिळते.
कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणी म्हणून अभिनेत्री कौशिकी खांडेकर यांना सन्मानित करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो. अन्नपूर्णा आजी स्वतः त्यांच्या सत्काराची जबाबदारी स्वीकारतात. परंतु या सोहळ्यामागे युवराज आणि कामिनी यांनी आखलेला एक भयानक कट लपलेला असतो. सत्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या हारातच त्यांनी बॉम्ब बसवलेला असतो आणि कौशिकीला इजा पोहोचवण्याचा त्यांचा डाव असतो.
कमळीला हारातील काहीतरी बरोबर नसल्याचा संशय येतो आणि ती तात्काळ तारिणीला याबद्दल कळवते. परिस्थिती तणावपूर्ण असतानाही दोघी शांतपणे उपाययोजना आखतात. तारिणी रंगमंचाच्या मागे राहून माइकद्वारे कमळीला प्रत्येक सूचना देत बॉम्बचे मेकॅनिझम समजावून सांगते, कारण तिची अंडरकव्हर कॉप ही ओळख अद्याप सर्वांपासून लपवून ठेवणे आवश्यक असते. कमळीच्या धाडसाने आणि तारिणीच्या सूचनांमुळे कौशिकीचा जीव वाचतो आणि एक मोठा अनर्थ टळतो.
या विशेष भागात कमळीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विजया बाबर (Vijaya Babar) हिने ‘तारिणी’ टीमसोबतचा अनुभव सांगताना अतिशय भावूक प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “तारिणीच्या कलाकारांसोबत काम करणे माझ्यासाठी वेगळाच आनंद होता. शिवानी सोनारशी (तारिणी) माझी ओळख आधीची असल्याने सेटवरची केमिस्ट्री उत्तम जमली. या भागात मी एक खास डान्स परफॉर्मन्स सादर केला आणि तो मी केवळ एका तासात शिकला. इतक्या कमी वेळेत परफॉर्म करणे माझ्यासाठी नवेच होते आणि याचे श्रेय माझ्या कोरिओग्राफरला नक्कीच द्यावे लागेल.”
विजया बाबर पुढे म्हणाली, “तारिणीची शैली, त्यातील थरार आणि काम करण्याचं वातावरण खूप वेगळं होतं. प्रेक्षकांना हा कमळी-तारिणीचा महासंगम आवडेल, अशी मला पूर्ण खात्री आहे.”
हे पण वाचा.. इंद्रायणी भातापासून भाजणी वड्यांपर्यंत; ऐश्वर्या नारकर अविनाश नारकर जोडप्यांची ऋतुजा बागवेच्या रेस्टॉरंटला खास भेट
या एपिसोडने दोन मालिकांच्या चाहत्यांना एकत्र आणत एक वेगळाच अनुभव देण्यात यश मिळवले आहे. झी मराठीवरील हा खास संगम सोशल मीडियावरही चर्चेत आहे.
हे पण वाचा.. तू ही रे माझा मितवा मध्ये ईश्वरीचा कडक इशारा; लावण्याचा प्लॅन फसला, नव्या प्रोमोने वाढवली उत्सुकता







