isha keskar birthday rishi saxena special post :अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना हे मराठी मनोरंजनविश्वातील एक गोड आणि लोकप्रिय जोडपे मानले जाते. सोशल मीडियावर नेहमीच त्यांच्या नात्याची झलक पाहायला मिळते. आज ईशाच्या वाढदिवसानिमित्त ऋषीने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा तिच्याबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
ऋषी सक्सेनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ईशासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले असून त्यासोबत एक भावनिक संदेशही लिहिला आहे. त्याने लिहिलं आहे, “प्रिय स्वप्नाळू, तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होवोत. एक वर्ष मोठं झाल्याबद्दल आणि कदाचित एक वर्ष अधिक शहाणं झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! वाढदिवसाच्या शुभेच्छा, ईशा केसकर.” या ओळींमधून ऋषीचं प्रेम आणि आपुलकी स्पष्ट जाणवते. चाहत्यांनीदेखील या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करत या जोडप्याला प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत.
‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात ओळख निर्माण करणारा ऋषी सक्सेना आज मराठी प्रेक्षकांचा लाडका अभिनेता बनला आहे. त्याचं साधं, संयमी व्यक्तिमत्व आणि अभिनय कौशल्य यामुळे त्याने वेगळी ओळख मिळवली. तर ईशा केसकर हिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि इतर मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
या दोघांची लव्हस्टोरीही तितकीच खास आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोच्या सेटवर ईशा आणि ऋषीची पहिली भेट झाली. त्या भेटीत फारसं बोलणं न झालं तरी ईशा ऋषीच्या शांत स्वभावावर लगेच भाळली. काही महिन्यांनंतर एका पुरस्कार समारंभात दोघांची पुन्हा भेट झाली आणि तेव्हाच त्यांच्या संवादाची सुरुवात झाली. ईशानेच पुढाकार घेत ऋषीला कॉफीसाठी आमंत्रित केलं आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.
हे पण वाचा.. लोक कसं बघतात यापेक्षा स्वतःची डिग्निटी महत्त्वाची”, अभिनेत्री ऋचा गायकवाडचा विचारप्रवर्तक सल्ला
२०१८ मध्ये ऋषीने इन्स्टाग्रामवर ईशासोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. सध्या हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असून त्यांच्या प्रेमकथेची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा असते. आज ऋषीच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा ईशा केसकर आणि ऋषी सक्सेनाच्या प्रेमाची झलक सर्वांना पाहायला मिळाली आहे.
हे पण वाचा.. धक्कादायक ट्विस्ट! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मधुभाऊ उघड करणार सायलीच्या भूतकाळाचं सत्य









