hruta durgule pahile prem ani breakup : मराठी प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रींपैकी एक हृता दुर्गुळे (Hruta Durgule) नुकतीच तिच्या आगामी ‘आरपार’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत चर्चेत आली. या खास संवादात हृताने तिच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाचा अनुभव आणि कॉलेज काळातील ब्रेकअपबद्दल मनमोकळं बोलताना प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली.
चित्रपट ‘आरपार’ १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटात हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. प्रमोशनदरम्यान या दोघांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी हृताने तिच्या शालेय आणि कॉलेजमधील आठवणी सांगितल्या.
हृता सांगते, “मी आठवीत असताना पहिल्यांदा प्रेमात पडले. खरं तर ते जास्त करून फोन अफेअर होतं. त्यावेळी मला एका मुलाने प्रपोज केलं आणि मी होकार दिला. आईच्या फोनवरून आम्ही अनेकदा बोलायचो. पण गंमत म्हणजे आईने मला अनेकदा रंगेहात पकडलं. आमचं रिलेशनशिप फक्त दोन-तीन महिन्यांचं होतं आणि तेव्हा खरं प्रेम म्हणजे काय हे देखील समजत नव्हतं.”
ती पुढे हसत म्हणाली की, “तो माझ्या शाळेतला नव्हता. आम्ही मित्रांच्या माध्यमातून ओळख झालेली. तेवढाच एक छोटासा अनुभव.”
हृताने पुढे कॉलेजच्या दिवसांची आठवण सांगितली. “कॉलेजमध्ये असताना झालेल्या ब्रेकअपमुळे मला खूप त्रास झाला. मी आईला त्याबद्दल सांगितलं होतं आणि एकदा आईला म्हटलंही की, मला त्याला भेटायचं आहे. मात्र आई-वडिलांनी त्यावेळी स्पष्ट केलं की, आधी करिअरवर लक्ष द्या, प्रेमासाठी वेळ पुढे आहे.”
हृता कबूल करते की, त्या वेळी झालेला त्रास मोठा होता; पण कालांतराने तिला जाणवलं की, करिअर घडवणं महत्त्वाचं आहे.
हे पण वाचा.. अमृता धोंगडे आणि सोनाली पाटीलचा ‘ठुमक ठुमक…’ या गाण्यावरील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
२०२२ मध्ये दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत विवाहबंधनात अडकलेल्या हृता दुर्गुळे सध्या तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात समाधानी आहे. नुकतीच या जोडीने एक आलिशान गाडी खरेदी केली असून सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात.
हृता दुर्गुळे ही मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत स्वतःची वेगळी छाप सोडणारी अभिनेत्री आहे. फुलपाखरू मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली ही अभिनेत्री आता ‘आरपार’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना भावूक करण्यास सज्ज झाली आहे.









