मराठी चित्रपटसृष्टीतून प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं आणि आशयपूर्ण पाहायला मिळत आलं आहे. छोट्या पडद्यावरून घराघरांत पोहोचलेला आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणा दा म्हणून प्रचंड लोकप्रिय झालेला अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर वेगळ्या रूपात झळकणार आहे. त्याच्या आगामी ‘अरण्य’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Hardeek Joshi ने आजवर ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, ‘नामदेव बी.एस्सी अॅग्री’, ‘जाऊ बाई गावात’ अशा अनेक मालिकांतून काम केले आहे. त्याचबरोबर रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करूनही त्याने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. मात्र, त्याची खरी ओळख ठरली ती ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतल्या राणा दा या दमदार भूमिकेमुळे. आजही त्याचा उल्लेख झाला की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर तोच करारी राणा दा उभा राहतो.
अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचा आगामी ‘अरण्य’ चित्रपट प्रेक्षकांना एका नव्या विश्वात घेऊन जाणार आहे.
‘अरण्य’च्या टीझरची सुरुवात दाट जंगलाच्या दृश्याने होते. या निसर्गरम्य पण गूढ वातावरणात अचानक Hardeek Joshi चा प्रवेश होतो. तो दमदार आवाजात म्हणतो – “माझी लोकं मला या जंगलाचा वाघ म्हणायची.” त्याच्या हातातली बंदूक त्याची ओळख ठरते. पण लगेचच तो एक वेगळं वाक्य बोलतो – “बंदूक माझी ओळख होती, पण जेव्हापासून ही वेडाबाई माझ्या आयुष्यात आली, तेव्हापासून सगळंच बदललं.”
या संवादातून प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढवण्याचं काम दिग्दर्शकाने उत्तमरीत्या केलं आहे. पुढे चेतन चावडासोबत त्याचा संघर्ष दाखवण्यात आला असून, “वर एकच नियम, जो गुंतणार तो मरणार” हा संवाद चित्रपटाला वेगळंच वजन देतो.
टीझरमध्ये केवळ Hardeek Joshi च नाही तर इतर कलाकारांचीदेखील झलक पाहायला मिळते. सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, चेतन चावडा, हृतिका पाटील यांच्यासह अभिनेत्री वीणा जगतापही या चित्रपटात दिसणार आहे. सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत ऐश्वर्या नावाची खलनायिका साकारत असलेली वीणा आता मोठ्या पडद्यावर कोणती भूमिका साकारणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
याशिवाय, एका लहान मुलीचा आवाज टीझरमध्ये ऐकायला मिळतो – “बाबा सांग ना, आपण या जंगलातून कुठे चाललोय? मला खूप भीती वाटतेय.” या एका वाक्यानेच प्रेक्षकांना कथा रोमांचक आणि थरारक असणार हे स्पष्ट होतं.
जरी टीझर प्रदर्शित झाला असला तरी चित्रपटाची नेमकी कथा काय आहे, याबद्दल निर्मात्यांनी अजूनही पडदा उघडलेला नाही. जंगल, संघर्ष, बंदूक, आणि नात्यांचं गुंतागुंतीचं समीकरण या सगळ्यांवर चित्रपट बेतलेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो. पण खरी गोष्ट काय आहे, हे १९ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहातच कळणार आहे.
हे पण वाचा.. Usha Nadkarni यांनी बालपणीचा धक्कादायक अनुभव सांगितला; म्हणाल्या, ‘वडिलांची भीती आजही मनातून गेली नाही’”
या चित्रपटाची निर्मिती शरद पाटील आणि अंजली पाटील यांनी केली आहे. दिग्दर्शनाची धुरा अमोल दिगंबर करंबे यांनी सांभाळली असून त्यांनीच याची कथा आणि पटकथा लिहिली आहे. नव्या दमाच्या दिग्दर्शकाने जंगलाच्या पार्श्वभूमीवर एक थरारक कथा उभी करण्याचा प्रयत्न केला आहे.
एकूणच, ‘अरण्य’ च्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. दमदार संवाद, रहस्यमय जंगल, तगडी स्टारकास्ट आणि Hardeek Joshiचा करारी अंदाज या सगळ्यांमुळे चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. १९ सप्टेंबर २०२५ ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून हार्दिक जोशीला पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
हे पण वाचा.. तब्बूकडून Priyadarshan Jadhav चे कौतुक; अभिनेता भावूक, म्हणाला – “अशा नटीने अभिनंदन केलं, हीच मोठी कमाई!”









