gharoghari matichya chuli 12 years flashback twist : मराठी मालिकांच्या दुनियेत नेहमीच नवनवे प्रयोग पाहायला मिळतात. अनेकदा कथा पुढे नेताना ‘लीप’चा वापर केला जातो. परंतु यावेळी स्टार प्रवाहने एक वेगळीच दिशा पकडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या लोकप्रिय मालिकेत घरोघरी मातीच्या चुली आता पहिल्यांदाच प्रेक्षकांना भूतकाळाचा प्रवास घडणार आहे. या मालिकेत एका मोठ्या ट्विस्टसह कथा थेट १२ वर्षांपूर्वी जाईल, अशी घोषणा चॅनेलने नुकतीच केली असून या अनोख्या प्रयोगाची चर्चा रंगू लागली आहे.
घरोघरी मातीच्या चुली सुरू झाल्यापासून प्रेक्षकांनी जानकी आणि ऋषिकेशच्या संसारातील गोड-तिखट क्षणांचा आनंद घेतला. घरातील परंपरा, नाती आणि संघर्ष यांचा छान ताळमेळ दाखवत ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. पण या जोडीची प्रेमकहाणी नेमकी कुठून सुरू झाली? पहिली भेट कशी झाली? प्रेमाची कबुली, अडथळे आणि लग्नापर्यंतचा प्रवास कसा घडला? याचे उत्तर आता प्रेक्षकांना फ्लॅशबॅकमधून मिळणार आहे.
सध्या मालिकेत ऐश्वर्या आणि मास्कमॅनमुळे रणदिवे कुटुंबात तणावाचे वारे वाहताना दिसत आहेत. पण १२ वर्षांपूर्वी जानकी-ऋषिकेशच्या आयुष्यात मकरंद नावाचं मोठं वादळ होतं. त्याची एंट्री, त्याचा उद्देश आणि त्याने निर्माण केलेली गोंधळाची परिस्थिती हे सगळं पुन्हा एकदा उलगडत जाईल. यामुळे कथानकाला नवचैतन्य मिळणार आहे आणि प्रेक्षकांना जुने किस्से नव्या रूपात बघायला मिळतील.
याबाबत अभिनेता सुमीत पुसावळे (ऋषिकेश) म्हणाला, “हा ट्रॅक खूप खास आहे. आजवर लोकांनी संयमी आणि स्थिर स्वभावाचा ऋषिकेश पाहिला आहे. पण १२ वर्षांपूर्वी तो अगदी वेगळाच होता. त्याचा बिनधास्त स्वभाव, संघर्ष आणि प्रेमासाठी केलेला प्रवास पुन्हा एकदा साकारताना आम्हालाच खूप मजा येतेय.”
हे पण वाचा.. ओंकार राऊतच्या आईला एकेकाळी वाटायची भीती; म्हणाली – मुलगा पण तेच करणार
घरोघरी मातीच्या चुली दररोज संध्याकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होते. आता या नव्या फ्लॅशबॅक पर्वाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अनोख्या धक्कादायक वळणामुळे प्रेक्षकांचा उत्साह नक्कीच वाढणार आहे, इतकं मात्र निश्चित!
हे पण वाचा.. मालिकेतील ‘जयंत’चा खरा संसार सुरु! मेघन जाधव आणि अनुष्काची प्रेमकहाणी, केळवण सोहळ्याने लग्नसोहळ्याला सुरुवात









