bigg boss marathi 6 new season timing : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो Bigg Boss Marathi 6 अखेर आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मागील सीझनप्रमाणे यंदाही अभिनेता रितेश देशमुख हा शो होस्ट करत असून, त्याच्या सहज, संवेदनशील आणि ठाम शैलीमुळे प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, यंदा एक मोठा बदल करण्यात आला असून तो म्हणजे शोच्या प्रसारणाची वेळ.
आतापर्यंत उशिरा रात्री प्रसारित होणारा बिग बॉस मराठी यंदा थेट रात्री ८ वाजता दाखवण्यात येणार आहे. हा बदल का करण्यात आला, याबद्दल कलर्स मराठीच्या मराठी क्लस्टरचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट सतिश राजवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेक्षकांचा विचार केंद्रस्थानी ठेवूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रेक्षकांना रोजचा भाग वेळेत पाहता यावा, उशीर होतोय किंवा झोपायचंय म्हणून शो चुकू नये, यासाठी लवकरची वेळ निवडण्यात आली आहे. शोची एकूण कालमर्यादा मात्र मागील वर्षाइतकीच असणार आहे.
Bigg Boss Marathi 6 मध्ये यंदा फक्त खेळ नव्हे, तर संपूर्ण अनुभव अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला आहे. मराठी प्रेक्षक चोखंदळ असल्यामुळे कंटेंट अधिक धारदार, वास्तववादी आणि सर्व वयोगटांना आपलासा वाटेल असा ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यंदा २१ ते ५५ वयोगटातील विविध स्वभाव, विचारधारा आणि पार्श्वभूमी असलेले स्पर्धक घरात पाहायला मिळणार आहेत, ज्यामुळे मतभेद, मैत्री, संघर्ष आणि भावना यांचा खेळ अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
या सीझनमधील बिग बॉसच्या घराची रचना देखील चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः घरातील बंक बेड हा एक वेगळा आणि लक्षवेधी घटक ठरला आहे. क्रिएटिव्ह टीमने यंदा घराच्या डिझाइनमध्ये नवीन प्रयोग केल्याचं स्पष्ट दिसून येतं. शिवाय, “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” ही थीम यंदाच्या सीझनला अधिक गूढ आणि रोचक बनवणारी ठरणार आहे.
रितेश देशमुख यांच्यासारखा लोकप्रिय आणि समतोल व्यक्तिमत्त्वाचा होस्ट मिळणं ही या शोची मोठी जमेची बाजू मानली जात आहे. खेळाडूंना योग्य मार्गदर्शन देत, त्यांच्या भावनांना समजून घेत, प्रेक्षकांपर्यंत शोचा खरा आत्मा पोहोचवण्याची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील, अशी अपेक्षा आहे.
हे पण वाचा.. अशोक मा.मा.’मालिका संपली, रसिका वखारकरची अशोक सराफांसाठी भावनिक पोस्ट आठवणींनी भरलेला शेवट
११ जानेवारीपासून सुरू होणारा Bigg Boss Marathi 6 हा सीझन प्रेक्षकांसाठी मनोरंजन, उत्सुकता आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला ठरणार आहे. रोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टारवर हा शो पाहता येणार असून, यंदाचा बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हे पण वाचा.. दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार! बिग बॉस मराठी ६ च्या घराची पहिली झलक चर्चेत









