bigg boss marathi 6 house first look : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेत असलेला रिअॅलिटी शो Bigg Boss Marathi 6 अखेर आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रत्येक सीझनप्रमाणेच यंदाही शो सुरू होण्यापूर्वीच घराची पहिली झलक पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ‘दार उघडणार… आणि नशिबाचा गेम पालटणार!’ ही यंदाच्या सीझनची मध्यवर्ती थीम असून, त्याच धर्तीवर संपूर्ण घराची रचना करण्यात आली आहे.
Bigg Boss Marathi 6 चं घर यंदा पूर्णपणे वेगळ्या अंदाजात सजवण्यात आलं आहे. तब्बल ८०० खिडक्या आणि ९०० दारांनी नटलेलं हे घर केवळ भव्यच नाही, तर खेळाच्या दृष्टीनेही महत्त्वाचं ठरणार आहे. थीमनुसार दारं उघडली की खेळाचं गणित बदलणार, हे संकेत घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून मिळतात. १०० हून अधिक कॅमेऱ्यांच्या सततच्या नजरकैदेत स्पर्धकांचा १०० दिवसांचा प्रवास यंदा अधिक चुरशीचा ठरणार आहे.
घराचं मुख्य प्रवेशद्वार पाहताच प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. प्रवेशद्वाराच्या मध्यभागी मोठं टाळं आणि त्यासोबत चावी अशी खास रचना करण्यात आली आहे. ही रचना यंदाच्या थीमला अधोरेखित करते. घराच्या बाहेरील गार्डन एरियामध्ये जिम, स्विमिंग पूल, आरामदायी सिटिंग व्यवस्था आणि पहिल्या मजल्यावरील बाल्कनी आहे, जिथे स्पर्धकांना मोकळा श्वास घेता येईल, पण खेळापासून सुटका नाही.
घराच्या आत प्रवेश केल्यावर प्रशस्त लिव्हिंग रूम, किचन आणि डायनिंग एरिया लक्ष वेधून घेतात. यंदा लिव्हिंग एरियातच एक खास, लहान खोली तयार करण्यात आली आहे. ही खोली गुलाबी थीममध्ये, राजेशाही लूकसह सजवण्यात आली असून, ती पाहताच कुतूहल वाढतं. या खोलीत कॅमेरे नसावेत, असं प्रथमदर्शनी वाटतं, मात्र याबाबतची स्पष्टता शो सुरू झाल्यानंतर मिळेल. जर इथे कॅमेरे नसतील, तर Bigg Boss Marathi 6 मध्ये याच खोलीत अनेक गुपितं, चर्चा आणि गॉसिप रंगण्याची दाट शक्यता आहे.
हे पण वाचा.. अशोक मा.मा.’मालिका संपली, रसिका वखारकरची अशोक सराफांसाठी भावनिक पोस्ट आठवणींनी भरलेला शेवट
दरम्यान, या सीझनमध्ये कोणते स्पर्धक घरात प्रवेश करणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज, ११ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता होणाऱ्या ग्रँड प्रीमियरमध्ये होस्ट रितेश देशमुख स्पर्धकांची ओळख करून देणार आहे. Bigg Boss Marathi 6 हा सीझन प्रेक्षकांना ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर तसेच ‘जिओहॉटस्टार’वर पाहता येणार आहे. नव्या घरासह, नव्या नियमांमुळे यंदाचा खेळ नक्कीच वेगळा आणि अधिक थरारक ठरणार आहे.
हे पण वाचा.. ४३ व्या वर्षीही फिट आणि फ्रेश! अर्जुन बिजलानीने सांगितलं फिटनेसचं सोपं आणि प्रभावी गुपित









