bigg boss marathi 6 first contestant super model entry : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या रिअॅलिटी शोपैकी एक असलेला Bigg Boss Marathi 6 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ११ जानेवारीला या शोचा ग्रँड प्रीमियर पार पडणार असून, अवघे काही दिवस शिल्लक असतानाच प्रेक्षकांमधील उत्सुकता कमालीची वाढली आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही घरात कोणते स्पर्धक प्रवेश घेणार, याबाबत सोशल मीडियावर विविध अंदाज आणि चर्चा सुरू होत्या. मात्र, आतापर्यंत ‘कलर्स मराठी’कडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती.
आता Bigg Boss Marathi 6 सुरू होण्यास फक्त चार दिवस उरलेले असताना वाहिनीने पहिल्या स्पर्धकाची झलक शेअर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. या व्हिडीओमध्ये यंदा घरात एका सुपर मॉडेलची एन्ट्री होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. “फॅशनच्या जगातील ही सुंदरी, भल्याभल्यांवर पडणार भारी… ओळखा पाहू कोण?” असे कॅप्शन देत हा टीझर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये साडी नेसलेली एक अभिनेत्री दिसत असली, तरी तिचा चेहरा मुद्दाम लपवण्यात आला आहे.
या पोस्टनंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या सुपर मॉडेलचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. काहींनी प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचे नाव पुढे केले आहे, तर काही जणांनी सुपर मॉडेल सोनाली राऊत Bigg Boss Marathi 6 मध्ये सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे. सोनाली राऊतच्या सहभागाबाबतच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू असल्याने या अंदाजाला आणखी बळ मिळालं आहे. मात्र, काही युजर्सनी हा व्हिडीओ एआयच्या मदतीने तयार केलेला रील असू शकतो, असंही मत व्यक्त केलं आहे.
या सर्व चर्चांमुळे शोबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ही सुपर मॉडेल नेमकी कोण आहे, याचा उलगडा ११ जानेवारीला रात्री ८ वाजता ग्रँड प्रीमियरमध्ये होणार आहे. यंदा Bigg Boss Marathi 6 च्या घरात १६ हून अधिक स्पर्धक प्रवेश घेणार असून, त्यांची अधिकृत घोषणा सूत्रसंचालक रितेश देशमुख करणार आहेत.
हे पण वाचा.. स्टार प्रवाहची ‘काजळमाया’ ठरली अल्पायुषी, अवघ्या दोन महिन्यांत मालिका ऑफ एअर होणार
यंदाच्या सीझनची आणखी एक खास बाब म्हणजे घराची भव्य आणि वेगळी संकल्पना. सुमारे १३,००० चौरस फूट क्षेत्रफळात उभारलेलं हे घर अनेक आश्चर्यांनी भरलेलं असणार आहे. प्रत्येक दारामागे एखादं नवं आव्हान, धक्का किंवा आयुष्य बदलणारा क्षण लपलेला असेल. “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” ही टॅगलाईन केवळ घोषणा नसून, Bigg Boss Marathi 6 च्या संपूर्ण सीझनची दिशा ठरवणारी ठरणार आहे. त्यामुळे यंदाचा बिग बॉस मराठीचा प्रवास अधिक रंगतदार आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला असणार, यात शंका नाही.
हे पण वाचा.. कमळी लक्ष्मी निवास महासंगमात रंगणार मोठा ट्विस्ट, शाळा वाचवण्यासाठी सर्वजण एकत्र







