bigg boss marathi 6 day 1 fight : बिग बॉस मराठी ६ चा पहिला दिवस प्रेक्षकांसाठीच नव्हे तर घरातील स्पर्धकांसाठीही धक्कादायक ठरला. पहिल्याच दिवशी बिग बॉसने शिक्षा म्हणून मुख्य घर सर्व स्पर्धकांसाठी बंद ठेवलं आणि तब्बल १७ स्पर्धकांना केवळ गार्डन एरियामध्येच राहण्याचा आदेश दिला. या अनपेक्षित निर्णयामुळे घरातील सदस्यांची मोठी कोंडी झाली. सकाळपासून त्यांना ना नीट बसण्याची सोय, ना प्यायला पाणी मिळालं. त्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलं.
पाण्याच्या कमतरतेमुळे अखेर ‘फोकस इंडियन’ करण सोनावणे याने स्विमिंग पूलमधील पाणी पिलं. हा प्रकार पाहून इतर स्पर्धकांनी त्याला आरोग्याच्या दृष्टीने ते पाणी पिऊ नकोस, असा सल्ला दिला. मात्र करणने, आपण पोहताना अनेकदा नकळत हेच पाणी अंगात जातं, त्यामुळे उगाच विषय वाढवू नका, असं म्हणत स्वतःचं समर्थन केलं. याच मुद्द्यावरून करण आणि रुचिता जामदार यांच्यात चर्चा सुरू असताना तन्वीने मध्ये हस्तक्षेप केला आणि “मी तुला काळजीपोटी सांगितलं होतं, फालतू बोलू नकोस,” असं म्हणत करणला सुनावलं. याच क्षणापासून वादाला तोंड फुटलं.
करण बाजूला राहिला, पण रुचिता आणि तन्वी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली. “आम्ही दोघं बोलत होतो, तू मध्ये का आलीस?” असा सवाल रुचिताने केल्यानंतर तन्वीही आक्रमक झाली. आवाज चढला, शब्द तीव्र झाले आणि Bigg Boss Marathi 6 मधील पहिलं भांडण अधिकृतपणे सुरू झालं. घरातील इतर स्पर्धकांनी टाळ्या वाजवत ‘वेलकम टू बिग बॉस’ असं म्हणत या वादाचं स्वागत केलं, पण त्या क्षणी तन्वी आणि रुचिता यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला होता.
वादादरम्यान दोघींनी एकमेकींवर वैयक्तिक शब्दप्रयोग केल्याचं पाहायला मिळालं. यामुळे वातावरण अधिकच तापलं. अखेर या घटनेनंतर तन्वी भावुक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले. ती दिपाली सय्यद आणि प्राजक्ताशी बोलताना म्हणाली की भांडण होतं, पण त्यालाही एक मर्यादा असते. शब्दांनी माणूस दुखावला जातो आणि कोणाच्या घरातल्यांवर किंवा वैयक्तिक आयुष्यावर बोलू नये, असं तिने स्पष्ट केलं.
हे पण वाचा.. १० वर्षांनंतर बिग बॉसच्या घरात पुनरागमन; बिग बॉस मराठी ६ मध्ये सोनाली राऊत ची धमाकेदार एन्ट्री
यानंतर करण सोनावणे आणि सोनाली राऊत यांनीही रुचिता जामदारला शब्दांचा वापर जपून करायला हवा, अशी समज दिली. Bigg Boss Marathi 6 च्या पहिल्याच दिवशी सुरू झालेला हा गोंधळ पुढील दिवसांमध्ये आणखी काय वळण घेणार, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. ईशा केसकरचा नवा प्रवास सुरू; अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, ‘नवीन प्रोजेक्ट’ची पोस्ट चर्चेत









