सोशल मीडियावर सतत चर्चेत राहणारा कंटेंट क्रिएटर अथर्व सुदामे (Atharva Sudame) गेल्या काही दिवसांत एका व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुणेरी टच असलेल्या त्याच्या मजेशीर रील्स अनेकांना आवडतात; पण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्याने बनवलेला एक व्हिडीओ काहींना खटकला. ‘मूर्ती एक, भाव अनंत’ या शीर्षकाच्या त्या रीलमध्ये एका मुस्लिम मूर्तिकाराकडून गणपतीची मूर्ती घेतानाचा प्रसंग दाखवण्यात आला होता. धार्मिक एकता आणि सौहार्दाचा संदेश यातून द्यायचा उद्देश होता, मात्र काही संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. विशेषत: ब्राह्मण महासंघाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
वाद वाढल्यानंतर अथर्व सुदामेने माफी मागत व्हिडीओ डिलीट केल्याचं सांगितलं. या घडामोडीवर आता ‘बिग बॉस मराठी ५’ फेम घनःश्याम दरवडे, ज्याला प्रेक्षक ‘छोटा पुढारी’ म्हणून ओळखतात, त्याने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
घनःश्यामने आपल्या युट्युब व्हिडीओमध्ये म्हटलं, “Atharva Sudame हे नाव आपल्याला माहीतच आहे. पुणेरी भाषेत टोमणे मारणारे मजेदार रील असोत किंवा सामाजिक संदेश देणारे व्हिडीओ – त्याने लोकांपर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांच्यासोबतही त्याचे चांगले संबंध आहेत. मात्र यावेळी गणेशोत्सवावर केलेल्या व्हिडीओमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आणि शेवटी माफी मागावी लागली. पण हा माणूस किती संघर्ष करून इथवर पोहोचला आहे, याचा विचार केला पाहिजे.”
तो पुढे म्हणाला की, “मी स्वतः तो व्हिडीओ पाहिला, त्यात काही चुकीचं वाटलं नाही. Atharva Sudame ने माफी मागून व्हिडीओही काढून टाकला आहे. खरं तर त्याच्या अनेक रील्स पाहताना लोक हसतात आणि त्याच वेळी सामाजिक विषयांवरही विचार करायला लावतात. त्यामुळे अशा छोट्या गोष्टींवरून त्याला मागे खेचू नये. तो आपलाच मुलगा आहे, त्याला मोठ्या मनाने माफ केलं पाहिजे.”
हे पण वाचा.. कॉस्मेटिक सर्जरीवर Madhavi Nimkar चं स्पष्ट मत; “नैसर्गिक सौंदर्य जपणं महत्वाचं पण…”
घनःश्याम दरवड्याने पुढे स्पष्ट केलं की, “आपला माणूस मोठं होतोय, तर त्याला साथ द्या. टीका करायचीच असेल तर विधायक करा. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट पटेलच असं नाही. मूर्ती मनोभावे बनवावी हा त्याचा उद्देश योग्य होता; पण काहींना ते पटलेलं नाही. इतिहासाची माहिती नसेल तर अशा संवेदनशील गोष्टी टाळायला हव्यात. मात्र अथर्वने मोठेपणा दाखवत माफी मागितली, हेही कौतुकास्पद आहे.”
शेवटी छोटा पुढारी म्हणतो, “Atharva Sudame ने वेगळं काही केलं नाही. उलट सामाजिक सलोखा दाखवण्याचा प्रयत्न केला. आता गणेशोत्सव जवळ आला आहे, बाप्पाच्या आशीर्वादाने हे प्रकरण इथंच थांबेल. पुढे अशा चुका टाळ आणि सावध रहा, एवढंच सांगायचं आहे.”
हे पण वाचा.. Nikki Tamboli गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज, अरबाजसोबत करतेय खास डेकोरेशन!









