ashvini mahangade swarajya new home post : मराठी टीव्हीवर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. वैयक्तिक आयुष्याशी निगडित फोटो-व्हिडीओ असो किंवा सामाजिक विषयांवरचं मत – अश्विनी चाहत्यांशी मनमोकळेपणानं संवाद साधताना नेहमीच चर्चेत राहते. अलीकडेच तिनं शेअर केलेली एक पोस्ट विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
अश्विनीनं आपल्या गावी असलेल्या घराचा एक फोटो शेअर करत वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या फोटोसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, “नानांनी खूप प्रेमाने आमच्यासाठी बंगला बांधला आणि सगळ्यात मागे खास चुलीसाठी खोली काढली. अनेकदा आम्ही तिथेच जेवायला बसतो. पण यात्रेच्या वेळी या खोलीचं खरं महत्व जाणवतं. घरातील मोठी असल्यामुळे भाकरी करणे ही माझी जबाबदारी ठरते, आणि माझी लहान भावंडं त्याचा आनंद घेत बसतात.”
तिनं पुढे लिहिलं की, “स्वराज्य असं आमच्या घराचं नाव देताना नानांनी आपली जबाबदारी पार पाडली. आता त्या स्वराज्याला टिकवणं आणि वाढवणं ही जबाबदारी आमच्यावर आहे.” या भावनिक शब्दांतून तिनं केवळ वडिलांची आठवण सांगितली नाही, तर कुटुंबाशी असलेलं नातं आणि परंपरेचं महत्त्व अधोरेखित केलं.
हे पण वाचा.. कराडच्या ग्रामस्थांची थेट मुंबईत हजेरी; ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेतील स्वरालीच्या अभिनयाचं कौतुक
अश्विनी महांगडे यापूर्वी ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत झळकली होती. त्यातील अनघा ही तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारते आहे. यापूर्वी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘अस्मिता’ मालिकांमधूनही ती घराघरात पोहोचली होती.
गावाकडील साधेपणा, घरातील मायेचं वातावरण आणि कुटुंबाशी असलेलं नातं याबद्दल बोलताना अश्विनी महांगडे वारंवार भावूक होताना दिसते. त्यामुळेच तिची ही नवी पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली असून अनेकांनी तिच्या या आठवणींवर प्रेम व्यक्त केलं आहे.
हे पण वाचा.. लपंडाव मालिकेत चेतन वडनेरे आणि रुपाली भोसलेच्या भूमिकां विशेष चर्चेत









