aboli maliket aditi dravid khalnayika : मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Aditi Dravid तब्बल तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतली आहे. ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका अबोली मध्ये ती प्रेक्षकांना एका खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असून, तिच्या या कमबॅकमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘अबोली’ मालिकेत अदिती द्रविड शीतल सरपोतदार या व्यक्तिरेखेत झळकणार आहे. या भूमिकेबद्दल अदिती स्वतः म्हणते, “मी जवळपास तीन वर्षांनी पुन्हा टेलिव्हिजनवर काम करतेय. ही भूमिका थोडीशी निगेटिव्ह आहे पण मला ती करताना प्रचंड मजा येतेय. बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर येत असल्यामुळे चाहत्यांचा प्रतिसाद बघायला उत्सुक आहे. तुमचं प्रेम असंच मिळत राहू द्या.”
अदितीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह सिनेविश्वातील सहकलाकारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री म्हणून तिचा गोड चेहरा आणि प्रभावी अभिनय प्रेक्षकांना नेहमीच भावला आहे. परंतु तिची ओळख केवळ अभिनेत्रीपुरती मर्यादित नाही. Aditi Dravid ही गीतकार, निवेदिका आणि नृत्यांगना म्हणूनसुद्धा परिचित आहे.
हे पण वाचा.. “माजिवडा उड्डाणपुलावरचा अनुभव; ‘माणुसकी अजून जिवंत आहे’ म्हणत मीरा जोशी ची हृदयस्पर्शी पोस्ट”
तिच्या कारकिर्दीकडे पाहिल्यास ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील ‘मंगळागौर’ हे लोकप्रिय गाणंही अदितीने लिहिलं होतं, ज्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. हे गाणं गायिका सावनी रविंद्रच्या आवाजात आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
तिच्या या पुनरागमनामुळे ‘अबोली’ मालिकेला नवी उर्जा मिळणार असून, खलनायिकेच्या नव्या व्यक्तिरेखेमुळे कथानकातही रंगत वाढणार हे नक्की. चाहत्यांसाठी मात्र अदिती द्रविडला पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पाहण्याचा आनंद मोठा ठरणार आहे.
हे पण वाचा..स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकांची जोरदार एंट्री; ‘नशीबवान’ ठरली स्लॉट लीडर, ‘लपंडाव’नेही मारली दमदार झेप









