ADVERTISEMENT

ट्रेनमधला  प्रसंग; Abhidnya Bhave ने सांगितली बालपणीची आठवण, व्यक्त केलं ठाम मत

लोकप्रिय अभिनेत्री Abhidnya Bhave हिने बालपणी ट्रेनमध्ये घडलेला एक अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला. ‘तारिणी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिज्ञाने या किस्स्याद्वारे चुकीविरोधात आवाज उठवण्याचं महत्त्व अधोरेखित केलं.
Abhidnya Bhave

मराठी मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी आणि दमदार अभिनयाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) सध्या ‘तारिणी’ मालिकेत कौशिकीची भूमिका साकारत आहे. ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ यांसारख्या मालिकांमुळे लोकप्रिय झालेल्या अभिज्ञाने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत एक अंगावर काटा आणणारा किस्सा सांगितला. तिच्या बालपणी ट्रेनमध्ये घडलेला हा प्रसंग आजही तिच्या मनात ठसलेला आहे.

Abhidnya Bhave ने सांगितलं की, एका प्रवासादरम्यान तिच्या डोळ्यांसमोर घडलेली घटना तिला हादरवून गेली. ती म्हणाली, “मी ट्रेनमधून प्रवास करत होते. माझ्यासमोर एक बाई बसली होती, तिच्यासोबत दोन मुलं – एक मुलगा आणि एक मुलगी होती. तो मुलगा वारंवार आपल्या बहिणीला मारत होता, पण त्यांची आई मात्र शांत होती. सुरुवातीला वाटलं, कदाचित ती दुर्लक्ष करतेय, पण प्रसंग सुरूच राहिला.”

यानंतर पुढे काय घडलं हे सांगताना अभिनेत्री Abhidnya Bhave म्हणाली, “तेव्हाच एक अनोळखी बाई पुढे आली आणि तिने त्या मुलाला कानशिलात लगावली. त्याच्या आईसमोरच हे घडलं. त्या बाईने मुलाच्या आईला सरळ शब्दांत सांगितलं – ‘तुम्ही आई म्हणून जे करणं आवश्यक आहे, ते मी करतेय आणि हे पाहून मला वाईट वाटतंय. कारण ही चूक तुम्ही थांबवत नाही, त्यामुळे तुमच्या मुलीवर अन्याय होतोय.’ त्या क्षणी मला जाणवलं की, चुकीचं कुठेही घडलं, सार्वजनिक ठिकाणी असो वा खासगी आयुष्यात, त्याला थांबवणं गरजेचं आहे.”

हे पण वाचा..Jui Gadkari च्या घरच्या गणपतीची झलक खास क्षण सोशल मीडियावर शेअर

या घटनेने Abhidnya Bhave ला एक महत्वाचा धडा शिकवला. ती पुढे म्हणाली, “तेव्हापासून मी एक नियम ठरवला आहे. माझ्या आजूबाजूला काही चुकीचं घडताना दिसलं, तर मी शांत बसत नाही. मैत्रीण असो वा मित्र, नातेवाईक असो वा ओळखीचा कोणी, चुकीचं वागत असल्यास मी नक्की बोलते. यामुळे अनेकदा अडचणीतही आले आहे, पण त्याचं काही वाटत नाही. आपलं मत व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. एक नातं तेव्हाच खऱ्या अर्थाने उभं राहतं जेव्हा त्यात चांगलं-वाईट सगळं बोलता येतं.”

Abhidnya Bhave च्या या आठवणीमुळे तिचा सामाजिक दृष्टिकोनही उघड झाला आहे. कलाकार म्हणून ती प्रेक्षकांना प्रभावित करतेच, पण व्यक्तिमत्त्वातूनही ती समाजातील चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणारी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

हे पण वाचा.. ‘आई कुठे काय करते’ फेम Abhishek Deshmukh ने शाडूच्या मातीची बाप्पाची मूर्ती घडवली, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर

Abhidnya Bhave इंस्टाग्राम पोस्ट..